सातारा : माढा लोकसभा मतदारसंघ मविआसाठी सुरक्षित करण्यासाठी धैर्यशिल मोहिते पाटील यांना उमेदवारी देऊन शरद पवारांनी फासे टाकले. धैर्यशिल मोहिते पाटलांना उमेदवारी दिल्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघ अर्धा जिंकल्याचा विश्वास व्यक्त केला जात असताना आता धैर्यशिल मोहिते पाटील भाजपतील इतर नाराज नेत्यांना शरद पवारांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे माळशिरस तालुक्यातील एकेकाळचे कट्टर विरोधक असलेले उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये हातमिळवणी झाली आहे. विशेष म्हणजे उत्तम जानकर हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याचीही माहितीही समोर आली आहे. मात्र यामुळे भाजपचं टेन्शन वाढलं आहे.
काही दिवसांपूर्वी धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. यावेळी फडणवीसांनी त्यांना आमदारकीची निवडणूक लढवण्याची ऑफर दिल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र तरीही ते महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरायला जाणार नसल्याचं जानकरांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे भाजपसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. माढा लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी जानकरांचा रोल महत्त्वाचा आहे.
दरम्यान उत्तम जानकर येत्या दोन दिवसात 19 एप्रिलला याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर 19 एप्रिलला निर्णय घेतला जाईल असं जानकरांकडून सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे धैर्यशिल मोहिते पाटील यांच्यासोबत जानकरांची हातमिळवणी झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानकर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.