मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा (Madha Lok Sabha) मतदारसंघात राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . या मतदारसंघातील माळशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी दोन दिवसांपूर्वीच नागपूरला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याच बोललं जात असतानाच आता उत्तम जानकर यांनी राजकारणातले वस्ताद शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे . त्यामुळे आता माढ्यात भाजपचा डाव फसणार असल्याचे दिसून येत आहे जानकर हे शरद पवार यांना भेटण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे .
या भेटीवर बोलताना जानकर म्हणाले , आमच्यावर दोन्ही बाजुंच्या कार्यकर्त्यांचा दबाव आहे. मोहिते पाटील आणि आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून विरोधक आहोत. अशा परिस्थितीत एकत्र कसं यायचं, याचं मार्गदर्शन आम्हाला पवारसाहेबच करु शकतात . त्यामुळे तालुक्यातील आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि मोहिते-पाटील यांच्या कार्यकर्त्यांची प्राथमिक चर्चा झाली आहे. आता तशीच चर्चा पवारसाहेबांसमोर होणार आहे. या बैठकीत निर्णय होईल, त्यासाठी मी आणि मोहिते पाटील पवार साहेबांची भेट घेणार आहोत असे त्यांनी सांगितले .
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परतलेले धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्याचा विचार जानकरांकडून सुरू आहे. याची कुणकुण लागताच भाजपकडून त्यांना आपल्या गोत्यात येण्यासाठी गळ घालण्यात आली होती . मात्र तेच जानकर आज शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत त्यांच्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटीलदेखील आहेत.आज शरद पवारांचं मार्गदर्शन घेऊन मग चर्चा करू. मग कार्यकर्त्यांसोबत बोलून १९ एप्रिलला निर्णय घेऊ, असं जानकरांनी पवारांच्या भेटीला जाताना सांगितलं. आम्ही कुठे जाणार ते आम्हालाच माहिती नाही. आम्हाला समजलं की तुम्हाला सांगतो,असेही ते म्हणाले .दरम्यान .या मतदारसंघात भाजपनं जानकरांना निवडणुकीची तयारी करायला सांगितली होती. पण उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याचंहीं जानकरांनी सांगितलं.
या मतदारसंघात भाजपनं रणजितसिंह नाईक-निंबाळकर ( Ranjitsingh Naik Nimbalkar ) यांना उमेदवार जाहीर केल्यानंतर धैर्यशील मोहिते-पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी भाजपला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला . यानंतर या मतदारसंघात मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक आणि माळशिरस तालुक्यातील तुल्यबळ नेता अशी ओळख असणाऱ्या उत्तम जानकर यांची समजूत काढत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची दोन वेळा भेट घेतली होती आता तेच जानकर शरद पवारांच्या भेटीला आल्याने भाजपची धडधड वाढली आहे .