नागपूर- होणार होणार, अशी चर्चा आणि अत्सुकता असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे. गेल्या १० ते १५ दिवसांपासून रणरणत्या उन्हात सुरु असलेला पहिला टप्प्यातील प्रचार आज संध्याकाळी संपतोय. पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.
कोणत्या पाच लोकसभा मतदारसंघात मतदान
पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होतंय.
१. नागपूर – या ठिकाणी भाजपाचे नितीन गडकरी यांच्यासमोर काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचं आव्हान असणार आहे. वंचित बहुजन आघाडीनं या मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे.
२. रामटेक- रामटेकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत आलेले राजू पारवे यांच्यासमोर उमेदवारी रद्दबातल झालेल्या रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचं आव्हान असणार आहे. श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत.
किशोर गजभिये या ठिकाणाहून अपक्ष म्हणून रिंगणात असून त्यांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं या तिरंगी लढतीत कुणाला फायदा होणार, हे पाहावं लागणार आहे.
३. भंडारा गोंदिया – या मतदारसंघात भाजपाचे सुनील मेंढे यांच्यासमोर काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे हे रिंगणात आहेत. या मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांची साथ मिळाल्यानं महायुतीचा विजय सोपा असल्याचं मानण्यात येतंय. मात्र बंडखोरीचा फटका कुणाला बसणार हे पाहावं लागणार आहे. भाजपाचे संजय कुंभलकर हे बसपाच्या तिकिटावर तर काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये हे अपक्ष रिंगणात उतरलेले आहेत. वंचित बहुजन आघाडीनं संजय केवट यांना संधी दिली आहे. बंडखोर आणि वंचितचा फटका कुणाला बसणार हे पाहावं लागणार आहे.
४. गडचिरोली-चिमूर- या मतदारसंघात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच लढत आहे. विद्यमान खासदार अशोक नेते यांना भाजपानं पुन्हा एकदा मैदानात उतरवलेलं आहे. तर काँग्रेसकडून डॉ. नामदेव किरसान हे रिंगणात आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले धर्मरावबाबा अत्राम महायुतीत असल्यानं त्याचा फायदा भाजपाला होणार आहे. डॉ. नामदेव उसेंडी, डॉय चंदा आणि नितीन कोडवते यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केल्यानं महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे.
५. चंद्रपूर – या मतदारसंघात भाजपाचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यातल्या लढतीकडे विदर्भाचं लक्ष असणार आहे. बसपाचे राजेंद्र रामटेके आणि वंचितचे राजेश बेले यांची उमेदवारी कुणाचं नुकसान करणार हे पाहावं लागणार आहे.
पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय नेत्यांचा प्रचार
विदर्भातील पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघांत नरेंद्र मोदी यांच्या चंद्रपूर आणि रामटेकमध्ये दोन सभा पार पडल्या. तर राहुल गांधी यांनी भंडाऱ्यात सभा घेतली. अमित शाहा, योगी आदित्यनाथ यांच्याही सभा पार प़डल्यात. आज संध्याकाळी प्रचार सभा संपल्यानंतर आता मतदानापर्यंतचे पुढचे काही तास सर्वपक्षीयांसाठी महत्त्वाचे असणार आहेत.