मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी बहुतांश मतदारसंघात लढती निश्चित झाल्या आहेत. काही ठिकाणी इच्छुक उमेदवारांना संधी न मिळाल्याने बंडाची तयारी केली आहे. दरम्यान, माळशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली . या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत माढ्यातील सस्पेन्स मात्र कायम ठेवला आहे. ते म्हणाले , आमच्या तालुक्यातील लोकांची इच्छा आहे की, शरद पवारांसोबत जावे. आम्ही एकत्र आलो तर मी माळशिरसचा आमदारकीचा उमेदवार असू शकतो. १९ तारखेला अंतिम निर्णय होईल, असे उत्तम जानकर यांनी सांगितले. .
ते पुढे म्हणाले , माढा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार यांच्यासोबत आज आमची बैठक झाली. यामध्ये निवडणुकीसाठी माढामधील लोकांनी काय केले पाहिजे, याबद्दल चर्चा झाली. त्यांची ही इच्छा होती की, मी आणि मोहिते यांनी एकत्र यावं. याबाबत येत्या २, ३ दिवसात दुसरी बैठक होईल. १९ तारखेला माळशिरस आमदारकीबद्दल चर्चा होईल.असे म्हणत माढ्यातील सस्पेन्स कायम ठेवला आहे. दरम्यान याशिवाय या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मतमांतर असू शकतं. मी कुठल्याही प्रवेश पक्षात करणार नाही. मी सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहे. जरी मी अजित पवार गटात असलो, तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलो होतो आणि आज पवारसाहेबांच्या भेटीला आलोय, असेही उत्तम जानकर यांनी स्पष्टपणे सांगितले.या भेटीबाबत त्यांच्यासोबत गेलेले धैर्यशील मोहिते म्हणाले, ‘शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं आहे. १९ तारखेला मेळावा होईल आणि त्यातून निर्णय होईल. राजकीय वैर संपायला पाहिजे हीच भूमिका आहे. रामराजे महायुती सोबत आहेत, त्यांचे सर्व कुटुंब आमच्या सोबत आहेत. चांगल्या मताने निवडून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
माळशिरसमधून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उत्तम जानकर यांना मोहिते पाटलांच्या मदतीची गरज असणार आहे. तर माढा लोकसभेसाठी जानकरांची धैर्यशील पाटील यांना मदत होईल. यामुळेच शरद पवार यांची दोन्ही नेत्यांनी एकत्र भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान दोन दिवसांपूर्वीच उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती