जळगाव – भाजपात घरवापसी करण्याच्या तयारीत असलेले शरद पवार राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना अमेरिकेतून चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन धमकीचे फोन आले आहेत. या प्रकरणी खडसे यांच्या वतीनं मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालण्याची विनंती एकनाथ खडसे यांनी केली आहे. दाऊद आणि छोटा शकील गँगकडून हे फोन आल्याचा दावा करण्यात येतोय.
प्रचाराच्या रणधुमाळीत धमकीचे कॉल्स
राज्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार सध्या जोरात सुरु आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांचा प्रचार सुरु आहे. दुसरीकडे त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांना हे धमकीचे फोन आलेले आहेत. खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. अशात त्यांना परदेशातून आलेले हे कॉल्स नेमके कशासाठी आहेत, याचा तपास आता पोलीस घेतायेत.
जळगाव, रावेरमधील महत्त्वाचे नेते खडसे
एकनाथ खडसे हे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते मानले जातात. उ. महाराष्ट्रात भाजपाच्या बळकटीकरणासाठी त्यांनी अनेक वर्ष कार्य केलं. २०१४ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले खरे, मात्र खडसे हे त्यांना सिनीयर होते. नंतरच्या काळात भोसरी जमीन घोटाळाप्रकरणात त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. २०१९ साली त्यांच्या सुनेला रावेरमधून तिकीट देण्यात आलं. मात्र खडसेंचं पुनर्वसन करण्यात आलेलं नव्हतं. जळगावातील फडणवीसांचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन आणि खडसे यांचंही आपआपसात पटत नव्हंत. राज्यात मविआचं सरकार आल्यानंतर खडसेंनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला होता. विधान परिषद निवडणुकीत ते जिंकले खरे, मात्र नेमकं त्याचवेळी एकनाथ शिंदे यांचं बंड झालं आणि राज्यात सत्ताबदल झाला. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खडसे शरद पवारांसोबत असतानाही रक्षा खडसे यांना भाजपानं उमेदवारी जाहीर केलीय. रावेरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे किंवा त्यांची कन्या रोहिणी खडसे या लढतील असं सांगण्यात येत होतं. मात्र खडसेंनी याला नकार दिला. आता ते पुन्हा भाजपावासी होणार आहेत.