अमरावती- जात प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टानं वैध ठरवल्यानं उमेदवारीचा मार्ग मोकळा झालेल्या नवनीत राणा पुन्हा चर्चेत आल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापूर्वीच त्यांना भाजपानं तिकीट जाहीर केलं आणि त्यांनी पक्षप्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी राणा यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला. सुप्रीम कोर्टातही जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा लढा त्यांनी साडे चार वर्ष दिला. जिल्ह्यातील भाजपाचे इतर नेते, पदाधिकारी आणि बच्चू कडू यांचाही राणांच्या उमेदवारीला विरोध होता, मात्र तरीही उमेदवारी नवनीत राणा यांनी मिळाली. यानंतर राणा यांनी प्रचारात मोदींच्या लाटेबाबत केलेल्या वक्तव्यानं त्या अडचणीत आलेल्या आहेत.
काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा
कार्यकर्त्यांना संबोधताना नवनीत राणा यांनी मोदींची हवा आहे, या फुग्यात राहू नका, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला होता. २०१९ साली मोदींची लाट असतानाही अमरावतीतून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर आपलाच विजय झाला होता, याची जाणीव त्यांनी कार्यकर्त्यांना करुन दिली होती. एखाद्या ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे ही निवडणूक लढवा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. मात्र मोदींची हवा नाही आणि फुग्यात राहू नका, या त्यांच्या सल्ल्यानंतंर मोदी लाट नसल्याचा अर्थ काढण्यात आला. यावरुन विरोधकांनी महायुतीवर टीकास्त्र सोडत, राणा यांना याची जाणीव झाल्याचं सांगितलं.
वादानंतर स्पष्टीकरण
हा वाद सुरु झाल्यानंतर नवनीत राणा यांनी या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण केलं. याबाबतचा एक व्हिडीओही त्यांनी शेअर केला. विरोधक गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी या व्हिडीोतून केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच ही निवडणूक लढवत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
वादानंतर थेट अडसूळांच्या भेटीला
वादानं चर्चेत असतानाच नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी आज थेट आनंदराव अडसूळ यांच्या घरी भेट दिली. आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांची भेट राणा दाम्पत्यानं घेतली. या भेटीमुळं आता राणा आणि अडसूळ यांच्यातलं असलेलं शत्रूत्व कायमचं मिटणार का, अशी चर्चा अमरावतीच्या राजकीय वर्तुळात सुरु झालेली आहे.
शत्रूत्व संपल्याचे अडसुळांचे संकेत
या भेटीनंतर राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, अशी प्रतिक्रिया अभिजीत अडसूळ यांनी दिली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा घरी आले तेव्हा त्यांचं स्वागत केलं. ही परंपरा आहे, असं त्यांनी म्हटलंय. पुढचा निर्णय हा कार्यकर्त्यांशी चर्चा करुन घेऊ असंही ते म्हणालेत. नरेंद्र मोदी यांचा ४०० पारचा नारा पूर्ण करण्यासाठी महायुतीत एकत्र काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
महायुती एकत्र- रवी राणा
तर या भेटीनंतर महायुतीतील घटक पक्ष एकत्र असल्याचा संदेश गेल्याचं रवी राणा यांनी सांगितलंय. रामाप्रमाणेच मोदींना पुन्हा सत्तेत आणायचं आहे, असं सांगत अडसुळांशी मैत्रीचं आवाहन त्यांनी केलंय. एकत्रित निवडणूक जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
हेही वाचाःएकनाथ खडसे यांना दाऊद आणि छोटा शकील गँगकडून धमकीचे फोन, काय आहे कारण?