मुंबई ; राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे . अज्ञात व्यक्तींनी एक-दोन वेळा नव्हे, तर तब्बल ४ वेळा खडसेंना फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिलीआहे . याप्रकरणी एकनाथ खडसेंनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून घटनेचा तपास केला जात आहे .
भाजपशी (BJP) काडीमोड घेत तब्बल अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress) प्रवेश केलेले एकनाथ खडसे लवकरच स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कदाचित या पार्श्वभूमीवर धमकीचा फोन येत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या धमकीत कोणतीही मागणी करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे . याआधी तब्बल चार वेळा त्यांना असे धमकीचे फोन आले होते . नुकताच अमेरिकेतून धमकीचा फोन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी जळगावच्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.धमकीच कारण अद्याप अस्पष्ट आहे. गेल्या दोन दिवस पासून एका अज्ञात फोनवरून छोटा शकीलचे नाव सांगत आपल्याला जीवे मारण्यात येणार असल्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचं सांगत विदेशातून हे कॉल येत असावे असा अंदाज खडसे यांनी व्यक्त केला आहे .
दरम्यान या काही दिवसात फोन करणाऱ्या व्यक्तीने दाउद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्या नावाने मला धमकी दिली आहे . आपकी कोई खैर नही, आपको मार देंगे, आपको मारना है, असं मला म्हटलं. सुरुवातीला मला वाटलं की, कुणी खोडसाळपणा करत असेल. पण त्यानंतर फोन येण्याचं प्रमाण वाढल्याने मी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे”, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. भाजपात घरवापसी करण्यापूर्वीच आलेल्या धमकीने आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .