मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election ) सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)यांनी, भाजपाची (BJP) घोडदौड महाराष्ट्रच रोखेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिला टप्पात येत्या 19 एप्रिलला मतदान होणार आहे. या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश असून या पाचही जागांवर काँग्रेस विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.या लोकसभा निवडणुकीत भाजपाची चांगलीच दमछाक होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदारसंघात उमेदवारी जाहीर करताना भाजपाला घाम फुटला आहे. काही ठिकाणी भाजपा दुसऱ्यांचे उमेदवार पळवत आहे, अशी टीका करतानाच, काही असे उमेदवार आहेत, ते इच्छुक नसतानाही त्यांना जबरदस्तीने तिकीट देण्यात आले आहे, असे सांगत वडेट्टीवार यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तिकीट जाहीर होण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी, आपण राज्यातच राहण्यास इच्छुक असून लोकसभा निवडणूक लढविण्यास आपला रस नसल्याचे म्हटले होते.त्यामुळे या भाजपची घोडदोड आता महाराष्ट्रच थांबवेल असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettivar)यांचे नाव आधी चर्चेत होते. त्यानंतर खुद्द विजय वडेट्टीवार यांना तिकीट दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, पक्षाने दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. याबद्दल बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, उमेदवारी मागण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. पण अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा असतो. त्यांनी तो घेतला असून तो आम्ही मान्य केला असल्याचे त्यांनी सांगितले.