अंतरवाली सराटी
मराठा समाजाच्या तरुणांसाठी सर्व मराठा बांधवांनी मुंबई एकत्र येण्याचं भावनिक आवाहन आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून केलं. आज पत्रकारांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. माझं काहीही झालं तरी चालेल पण मराठा समाजासाठी आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नसल्याचं जरांगे पाटील यावेळी म्हणाले. २६ तारखेला गल्लोगल्लीत पाय ठेवायला जागा दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा बांधव दिसेल. त्यामुळे सरकारने वेळीच मराठा समाजाची मागणी पूर्ण करा, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. विशेष म्हणजे आमरण उपोषण करीत ते मुंबईच्या दिशेने जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तब्बल ३ कोटी मराठा बांधव आरक्षणासाठी मुंबईत एकत्र येतील, असा दावा जरांगे पाटलांकडून केला जात आहे.
आज २० जानेवारी रोजी जरांगे पाटलांसह मोठ्या प्रमाणात मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. ते २६ जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मोठं आंदोलन पुकारणार आहेत. त्यांचा पहिला मुक्काम बीडच्या शिरूरमध्ये असणार आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या २० ते २८ जानेवारीपर्यंतच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मनोज जरांगे पाटलांसाठी प्रशस्त व्हॅनिटी व्हॅन
जरांगे पाटलांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी बीडचा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध करून दिली आहे. या व्हॅनमध्ये अत्याधुनिक सुविधी असून त्यात एक वैद्यकीय पथक तैनात असेल. यात एसी, फ्रीज, टीव्ही, मायक्रोऑन बाथरूम अशा सुविधा आहेत. दुपारी १२ पर्यंत जरांगे पाटील पायी चालतील. यानंतर त्यांना आराम करायचा असेल तर व्हॅनमध्ये सुविधा आहेत.