जालना : विधिमंडळाच्या अधिवेशनात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर आज पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. मराठा समाजाबद्दल फडणवीसांच्या मनात द्वेष आहे. मला तुरुंगात टाकलं तर त्यांना कळेल मराठा समाज काय आहे ते. जसा कापूस फुटल्यानंतर संपुर्ण शेत पांढरं दिसतं तसं सर्वत्र मराठेच-मराठे दिसतील, अशा इशारा जरागे पाटील यांनी फडणवीसांना दिला आहे.
पुढे जरांगे पाटील म्हणाले, महाराष्ट्र अशांत करू नका. माझ्यावर दबाव आणू नका, मी राजकीय टीका केलेली नाही. मी दहा टक्क्यांचे आरक्षण स्वीकारले तर मी चांगला आणि नाही स्वीकारले तर याला गुंतवा अशी राज्य सरकारची भूमिका आहे. त्यामुळे माझा संयम सुटला. मी नेत्याला बोललो असेल तर मराठा समाजाच्या नेत्याला राग येण्याचं कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारकडून दडपशाही सुरू असल्याची टीका पाटलांनी यावेळी केली.
सगेसोयरे आणि ओबीसीमधून आरक्षण यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तुरुंगात जावं लागलं तरी चालेल, माघारी येऊन पुन्हा लढेल असा इशारा जरागेंनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना दिला.