लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्यभरात दौरा करीत आहेत. आज जरांगे पाटील यांनी पुण्यातील देहू येथे संत तुकारामांचं दर्शन घेतलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी छगन भुजबळांना खुलं आव्हान दिलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळांमध्ये अनेकदा शाब्दिक चकमक पाहायला मिळते. अनेकदा जरांगे पाटील यांनी भुजबळांवर टीका केली आहे. आता तर त्यांनी भुजबळांना थेट आव्हान दिलं आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळांनी फक्त उभं राहावं, मग आमची भूमिका सांगतो, असा इशाराच जरांगेंनी भुजबळांना दिला आहे. भुजबळांबद्दल जास्तीचं काही विचारू नका. त्यांनी लोकसभा लढायचं अंतिम केल्यावर सांगतो, मनोज जरांगेंनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, मराठा समाजाने राज्यभरात कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचं हे ठरवावं. परंतू नाशिक लोकसभेतून जर भुजबळ उभे राहिले तर मग तिथं काय भूमिका घ्यायची हे मी त्यावेळी सांगतो.
आजवर कुठल्याही वादान न सापडलेले, साधी राहणी आणि शिवसेना ठाकरे गटाचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे राजाभाऊ वाजे यांना महाविकास आघाडीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. दरम्यान महायुतीकडून छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.