मुंबई : शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे घरवापसी करणार असल्याचं नक्की झालं असून ते पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपात पुन्हा प्रवेश करत असल्याच्या बातम्या येत होत्या. आता यावर शिक्कामोर्तब झाला असून, स्वतः खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे.
मात्र पक्ष प्रवेशादरम्यान एकनाथ खडसे यांच्यासमोर एक अट ठेवण्यात आली आहे. खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोट्यातून मिळालेल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यानंतरच भाजपमध्ये सहभागी व्हावं. तसेच त्या बदल्यात एकनाथ खडसे यांच्या आमदारकीच्या जागी रोहिणी खडसे यांची उरलेल्या कालावधीसाठी पाठवणी केली जाणार आहे. यासाठी खडसे यांच्याकडून देखील होकार देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत एकनाथ खडसे म्हणाले, भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मी भेट घेतली. भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. येत्या 15 दिवसांच्या आत हा प्रवेश व्हावा, अशा स्वरुपाचा माझा प्रयत्न आहे. माझा भाजपप्रवेश हा दिल्लीला होणार आहे. दिल्लीला केंद्रीय नेतृत्वाकडून मला ज्यादिवशी बोलवणं येईल त्याचदिवशी माझा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल, असेही ते म्हणाले.