मुंबई
काँग्रेसचे युवा नेता मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडून एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामागे उद्धव ठाकरेंचा संबंध असल्याचं सांगितलं जात आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात पार पडला होता. या मेळाव्यात आमदार आदित्य ठाकरेंनी मार्गदर्शन केलं होतं. सध्या या लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीतही ठाकरे गटाचा उमेदवार दक्षिण मुंबईतून निवडून येणार असा विश्वास उद्धव ठाकरेंनी मेळाव्यादरम्यान व्यक्त केला होता. मात्र काँग्रेस नेते मिलिंद देवरादेखील लोकसभेसाठी या मतदारसंघातून इच्छूक आहेत. २००४ आणि २००९ लोकसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून निवडून आले होते. त्यामुळे ठाकरेंच्या वक्तव्याने ते नाराज असल्याची माहिती आहे. दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाबरोबरच काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनी दावा केला होता. त्यामुळे नाराज देवरांनी शिंदे गटाची वाट धरली.
धक्कादायक म्हणजे महायुतीकडून दक्षिण मुंबईच्या लोकसभा मतदारसंघासाठी मिलिंद देवरांचं नाव पुढे असल्याची माहिती नाही. ही जागा शिंदे गटासाठी सोडल्याच्या चर्चांवर भाजपकडून असा कुठलाही शब्द दिला नसल्याचं सांगितलं जात आहे.
महाविकास आघाडीतून दक्षिण मुंबईत लोकसभा मतदारसंघातून मविआमधून ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत निवडणूक लढणार आहेत, अशी माहिती आहे. त्यामुळे देवरा यांना महायुतीतून निवडणूक लढवता येणार की नाही, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.