नवी दिल्ली
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात आज मणिपूरमधून सुरू होणार आहे. इंडिगोच्या एका विशेष विमानाने राहुल गांधींसह अन्य काँग्रेस नेता दिल्ली विमानतळावरुन निघाले. वातावरण बिघडल्यामुळे विमानाला उशिर झाल्याचं सांगितलं जात आहे.
सुरुवातीला ही यात्रा मध्य इंफालमधून सुरू होणार होती. मात्र मणिपूरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असल्याकारणाने मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी यात्रेची परवानगी दिली नाही. यासाठी काँग्रेस इंफालपासून २५ किलोमीटर दूर थौबल जिल्ह्यापासून आपल्या यात्रेला सुरुवात करेल. मणिपूरपासून सुरुवात करून ६,७१३ किलोमीटरची यात्रेचा २० मार्च रोजी मुंबईत शेवट होईल. राहुल गांधी ६०-७० काँग्रेस नेत्यांसह बसमधून हा प्रवास करतील. मात्र प्रमुख ठिकाणी ते पायी यात्रा करतील.
मध्य मुंबईतून मिलिंद देवरा लढणार?
भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात होण्यापूर्वीच काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. काँग्रेसमधील युवा चेहरा मिलिंद देवरा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज दुपारी २ नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होईल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा जबर धक्का मानला जात आहे. मिलिंद देवरा शिंदे गटातून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. दक्षिण मुंबईतील ठाकरे गटाचे अरविंद सावंत विद्यमान खासदार आहेत. मात्र अद्याप दक्षिण मुंबई जागा कोणत्या पक्षाला सोडणार याबाबत भाजपकडून कोणताही शब्द दिला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई जागेवरुन महायुतीत धुसफूस पाहायला मिळणार आहे.