मुंबई
ओबीसी समाजाचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी १६ नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. मात्र या दाव्यावरून अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. यात विरोधी पक्षांसह शिंदे गट आणि भाजपमधील नेत्यांचा समावेश आहे.
जितेंद्र आव्हाड – छगन भुजबळांनी जर राजीनामा दिला आहे तर सरकारी गाडी, बंगला असं कसं काय वापरतात? कॅबिनेट बैठकांना कसं जातात? याहून महत्त्वाचा राजीनामा हा राज्यपालांना द्यायचा असतो, मुख्यमंत्र्यांन नाही. इतके वरिष्ठ नेते असूनही तुम्ही ही गोष्ट माहीत नाही का? लोकांना मूर्ख समजू नका, मुख्यमंत्र्यांना राजीनामा देणं म्हणजे राजीनामा नसते. आम्हीही अनेकदा राजीनामा देतो असं सांगायचो. शरद पवारांकडे राजीनामा सुपूर्द करून यायचो. दोन तीन दिवसांनी ते तो राजीनामा फाडून टाकायचे. भुजबळ राजीनाम्याचं नाटक करतायेत.
संजय राऊत – भुजबळ म्हणतात मी राजीनामा दिला, पण स्वीकारला नाही. त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आहे की देवेंद्र फडणवीसांना? लोक म्हणतात की, छगन भुजबळांच्या तोंडून देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. मग त्यांचा राजीनामा कसा स्वीकारला जाईल? कॅबिनेटमध्ये जेव्हा सरकार किंवा मुख्यमंत्र्यांविरोधात भूमिका घेतली जाते, तेव्हा संबंधित मंत्र्याला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसतो.
देवेंद्र फडणवीस – भुजबळांच्या राजीनाम्याबद्दल केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगू शकतील. मी एवढंच सांगेन की, आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही किंवा मुख्यमंत्र्यांनीदेखील भुजबळांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.
संजय गायकवाड – छगन भुजबळांनी राजीनामा दिला की नाही मला माहीत नाही. त्या राजीनम्याची प्रत सुद्ध बाहेर आली नाही.
सुनील तटकरे – राजीनामा दिला की नाही याबाबत छगन भुजबळ माझ्याशी बोलले नाही. भुजबळांच्या भावना आम्ही निश्चितपणे जाणून घेऊ आणि त्यानंतर प्रतिक्रिया देऊ.
मनोज जरांगे पाटील – छगन भुजबळांना राजीनामा द्यायचा तर द्यावा अन्यथा देऊ नये. मात्र त्यांनी मराठ्यांविषयी बोलू नये. दुसरा विदुषक बाहेर निघाला. ते ओबीसी बांधव आणि सरकारला सुद्धा कलंक आहेत, आता आमची विजयी सभा मोजायला या.
या सर्व प्रतिक्रियांवरून एक मुद्दा स्पष्ट होतो की, कायदेशीरपणे राजीनामा हा राज्यपालांकडे द्यायचा असतो. मग त्यांना जर राजीनामा द्यायचाच असता, तर त्यांनी तो थेट राज्यपालांना का दिला नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.