मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांची उद्या १ फेब्रुवारी रोजी ईडीकडून चौकशी होणार आहे. यापूर्वी ईडीने २४ जानेवारी रोजी रोहित पवारांची चौकशी केली होती. ही चौकशी ही राजकीय सुडापोटी असून कारखाना लिलावाच्या बाबतीत सीआयडी आणि आर्थिक गुन्हे शाखा यांनी क्लोजर रिपोर्ट सादर केलेला असतानाही केवळ राजकीय सूड घेण्यासाठी ईडी चौकशी करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी केला आहे.
आमदार रोहित पवार यांनी मागील चार वर्षाच्या काळात वाढणारी बेरोजगारी, पेपरफुटी व त्यावर कायदा, कंत्राटी नोकरभरती, राज्यातून बाहेर गेलेले उद्योग यासह असंख्य प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले तसेच राज्यातील युवकांचे, महिलांचे शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटावेत म्हणून सरकारच्या पातळीवर लढा उभा करून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला. या लढ्याला महाराष्ट्रातून जनतेचा व युवकांचा मिळणारा पाठिंबा पाहून केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांच्या आडून राजकीय सूड उगवण्याचे काम सध्या भाजपा करत आहे, असंही वरपे यावेळी म्हणाले.
याच हुकूमशाही कारभाराच्या निषेधार्थ उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व राज्यातील जिल्ह्यांमध्ये जिल्हा पातळीवर घंटानाद आंदोलन करणार आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील जनतेचा व महाराष्ट्रातील संपूर्ण युवा वर्गाचा पाठिंबा आमदार रोहित पवार यांच्या पाठीशी असल्याने या सर्व संघर्षाच्या लढाईत विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व रोहित पवार बाहेर पडतील, असा विश्वास शरद पवार गटातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.