X: @therajkaran
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती मतदारसंघ (Amravati ) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा (Navaneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) लवकरच भाजपात (BJP) प्रवेश करण्याची शक्यता गेल्या काही दिवसापासून व्यक्त केली जात होती. यावर आता खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chadrashekhar Bavankule) यांनी प्रतिक्रिया देत नवनीत राणांच्या भाजपा प्रवेशच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
नागपूरमध्ये (Nagpur) आज भाजपाने मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यात नवनीत राणा भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे, असं सांगितलं जात होतं. यावर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, नवनीत राणा यांच्या भाजपा प्रवेशाची कोणतीही चर्चा नाही. नवनीत राणा यांना तसेच इतर मित्रपक्षांना आम्ही संमेलनाला बोलवलं आहे. त्यांचा कोणताही पक्ष प्रवेश नाही. त्या आमच्या सहयोगी म्हणून या संमेलनाला उपस्थित राहतील, असं बावनकुळे म्हणाले. त्यामुळे नवनीत राणांच्या भाजपा प्रवेशच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान बावनकुळेंच्या या स्पष्टीकरणानंतर नवनीत राणा (Navaneet Rana) यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्या प्रवेशाच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिलीय. भाजपाने आयोजित केलेले संमेलन युवकांसाठी आहे. मी एक तरुण खासदार असून भाजपाची सहयोगी आहे. त्यामुळेच त्यांनी मला आमंत्रण दिलंय. भाजपामध्ये माझी चर्चा होत आहे, हीच मोठी गोष्ट आहे. मला त्याचा आनंद आहे, असं नवनीत राणा म्हणाल्यात.