ताज्या बातम्या महाराष्ट्र

हे संवेदनशील नाही, गेंड्याच्या कातडीचे सरकार! – नाना पटोले यांची टीका

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

राज्यातील येड्याच्या सरकारने सर्व लाजलज्जा सोडलेली असून सर्वसामान्य जनता महागाईत होरपळत असताना मंत्रीमंडळ बैठकीवर कोटयवधी रुपयांची उधळपट्टी करणे हा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. स्वतःला संवेदनशील म्हणून घेणारे सरकार प्रत्यक्षात मात्र गेंड्यांच्या कातडीचे आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी येथे केली.  

शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत आहे, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड वाढलेल्या आहेत, मराठा आंदोलनासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. मराठवाड्यासह राज्यात एवढी गंभीर परिस्थिती असताना संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री, मंत्री व अधिकाऱ्यांची जनतेच्या पैशातून अलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

पटोले म्हणाले की, संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळ बैठक होऊन मराठवाड्यातील जनतेचे प्रश्नी मार्गी लागत असतील तर त्याचे स्वागतच आहे. पण त्यासाठी श्रीमंती थाट कशाला हवा? यापूर्वी संभाजीनगरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीवेळी आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी सुभेदारी या सरकारी विश्रामगृहात मुक्काम केला होता. पण एकनाथ शिंदे मात्र संभाजीनगरच्या सर्वात महागड्या अलिशान तारांकित हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत. त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री, मंत्री यांच्यासाठीही अलिशान हॉटेलमध्ये उत्तम सोय केली आहे. जेवणाची एक थाळी दीड हजार रुपयांची आहे अशा बातम्याही प्रकाशित झालेल्या आहेत.

इतर अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीही हॉटेल व गाड्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. हा बडेजाव करण्याची गरज नव्हती, साधेपणाने शासकीय विश्रामगृहात राहिले असते तर मराठवाड्याच्या जनतेच्या प्रश्नावर चर्चा करता आली नसती का?  पण सरकारला काही करायचे नाही फक्त दिखावा करायचा आहे. मराठा आरक्षणाच्या बैठकीप्रमाणे मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीमंडळ संभाजीनगरला येणार,“बैठक घेऊन बोलून रिकामे होणार आणि मराठवाड्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसून निघून जाणार,” असा आरोपही पटोले यांनी केला.

मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यातील खरीपाचे पीक वाया गेले आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना सरकारने अद्याप काहीच मदत केली नाही. सरकारने जाहीर केलेले कांद्याचे अनुदान अद्याप दिले नाही. ओबीसीसह मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च वाढतो म्हणून तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी नोकर भरती करण्याचा निर्णय सरकार घेते, शासन आपल्या दारी म्हणत जनतेच्या पैशावर कार्यक्रम करुन स्वतःची जाहीरातबाजी करते. हे सरकार असंवेदनशील असून जाहीरातबाजी, इव्हेंटबाजी व आता मंत्रिमंडळ बैठकीवर वारेमाप खर्च करणारे हे सरकार गेंड्याच्या कातडीचे असल्याची घणाघाती टिकाही पटोले यांनी केली.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात