मार्गिका 2A, 2B, 7 आणि 9 वर विशेष मान्सून आराखडा; एआय-आधारित पॅन्टोग्राफ मॉनिटरिंगमुळे काही सेकंदांत तांत्रिक तपासणी
मुंबई : मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महा मुंबई मेट्रोच्या मार्गिका २अ, २ब, ७ आणि ९ साठी व्यापक पावसाळी सज्जता आराखडा कार्यान्वित केला आहे. यामध्ये पारंपरिक अभियांत्रिकी उपाययोजनांसोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे.
यंदा मार्गिका २ब आणि ९ सुरू झाल्यानंतरचा हा पहिलाच पावसाळा असल्याने चारही मार्गिकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मेट्रो स्थानके, डेपो, व्हायाडक्ट, वीजपुरवठा यंत्रणा आणि प्रवासी सुरक्षेशी संबंधित सर्व बाबींची तपासणी करून आवश्यक उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत.
मान्सून कृती आराखड्यांतर्गत ३९ मेट्रो स्थानकांवर प्रत्येकी ६४ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असून, मार्गिका २अ, २ब, ७ आणि ९ वर एकूण २,४९६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे निरीक्षण जाळे उभारण्यात आले आहे. या माध्यमातून स्थानके, प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि महत्त्वाच्या परिचालन भागांवर २४ तास नजर ठेवली जाणार आहे.
पावसाचे पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी ३० आपत्कालीन पंप तैनात करण्यात आले आहेत. तसेच स्थानके, डेपो आणि उन्नत मार्गावरील नाल्यांची साफसफाई करून पाण्याचा निचरा सुरळीत राहील याची खबरदारी घेण्यात आली आहे.
वीजपुरवठा आणि परिचालन सुरक्षिततेच्या दृष्टीने १,०७० इन्सुलेटरची प्रतिबंधात्मक तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. याशिवाय २५ केव्ही केबल्स, पँटोग्राफ, ट्रान्सफॉर्मर्स, करंट ट्रान्सफॉर्मर्स आणि लाइटनिंग अरेस्टर्सची देखभाल करण्यात आली आहे. ट्रॅक्शन सब-स्टेशन्ससाठी पूर संरक्षण उपाययोजनाही अधिक मजबूत करण्यात आल्या आहेत.
रिअल-टाइम हवामान निरीक्षणासाठी १४ महत्त्वाच्या स्थानकांवर अॅनिमोमीटर बसविण्यात आले आहेत. या उपकरणांद्वारे वाऱ्याचा वेग सातत्याने मोजला जाईल आणि आवश्यकतेनुसार परिचालन निर्णय घेता येतील.
अनपेक्षित परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्य मार्गिकांवर तीन आणि डेपोमध्ये दोन अशा एकूण पाच राखीव मेट्रो गाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. अतिवृष्टी किंवा वीजपुरवठ्यातील अडथळ्यांमुळे सेवा विस्कळीत होऊ नये यासाठी पर्यायी यंत्रणाही तयार ठेवण्यात आली आहे.
पावसाळी काळात प्रवाशांना वेळेवर माहिती मिळावी यासाठी डिजिटल डिस्प्ले बोर्ड, सार्वजनिक घोषणा प्रणाली आणि मोबाइल अॅप्सद्वारे सेवा अद्यतने प्रसारित केली जाणार आहेत. तसेच २५ मे ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी २४x७ आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. ऑरेंज आणि रेड अलर्टच्या काळात विशेष नोडल टीम या नियंत्रण कक्षातून कार्यरत राहणार आहे.
एमएमआरडीएने यावर्षी प्रथमच एआय-सक्षम ऑटोमेटेड पॅन्टोग्राफ कंडिशन मॉनिटरिंग सिस्टमचा वापर सुरू केला आहे. मार्गिका २अ आणि ७ वर कार्यान्वित करण्यात आलेली ही प्रणाली हाय-स्पीड कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने धावत्या मेट्रो गाड्यांवरील पॅन्टोग्राफची रिअल-टाइम तपासणी करते. यापूर्वी सुमारे ३० मिनिटे लागणारी तपासणी आता काही सेकंदांत पूर्ण होत असल्याने तांत्रिक बिघाडांचे पूर्वनिदान आणि प्रतिबंधात्मक देखभाल अधिक प्रभावीपणे शक्य होत आहे.
याशिवाय एआय-आधारित व्हिडिओ अॅनालिटिक्स प्रणालीद्वारे प्रवाशांची चुकीच्या दिशेने हालचाल, सुरक्षा रेषा ओलांडणे, बेवारस सामान, संवेदनशील भागांमध्ये अनधिकृत प्रवेश आणि मेट्रो उपकरणांशी छेडछाड यासारख्या घटनांवर स्वयंचलितपणे नजर ठेवली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की, मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाची आर्थिक गती कायम ठेवण्यासाठी सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यावश्यक आहे. पावसाळ्यातही अखंडित सेवा देण्यासाठी एमएमआरडीएने केलेली ही तंत्रज्ञानाधारित तयारी भविष्योन्मुख आणि प्रवासी-केंद्रित पायाभूत सुविधांप्रती शासनाच्या वचनबद्धतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
एमएमआरडीएच्या मते, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मजबूत प्रत्यक्ष अभियांत्रिकी उपाययोजनांच्या माध्यमातून पाऊस असो वा ऊन, प्रत्येक प्रवाशाला सुरक्षित, विश्वासार्ह आणि अखंडित प्रवासाचा अनुभव देणे हेच या संपूर्ण पावसाळी आराखड्याचे उद्दिष्ट आहे.


zimerovertover
June 9, 2026I needed to write you the little word just to give thanks the moment again on the exceptional information you have discussed above. This has been pretty open-handed of you to offer unreservedly what exactly a number of people could possibly have offered for sale as an ebook in making some bucks on their own, primarily given that you might well have done it in case you considered necessary. The basics also served as the great way to be aware that other people online have the same desire the same as my very own to understand more when it comes to this issue. I am sure there are several more pleasurable instances up front for many who looked over your blog post.