मुंबई: गेल्या पंचवीस वर्षांत सत्तेत असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी मुंबई (Mumbai) ही “सोन्याची अंडी देणारी कोंबडी” होती, अशी घणाघाती टीका करत, कोविड काळातील खिचडी घोटाळा, बनावट कोविड सेंटर आणि बॉडीबॅग घोटाळ्यांचे आरोप असलेल्यांनी टोमणे मारण्याऐवजी आधी स्वतःकडे पाहावे, असा सणसणीत टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी लगावला.
शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे पार पडला. यावेळी आयोजित सत्कार सोहळ्यात शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी, नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

नगर परिषदांच्या निकालांतून (Municipal Coucil Elections) शिवसेना चांदा ते बांद्यापर्यंत विस्तारली असल्याचे सांगत, घराघरात धनुष्यबाण पोहोचवल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता, तसेच विधानसभा निवडणुकीतही (Assembly Elections) तो इतर पक्षांच्या तुलनेत अधिक चांगला असल्याचा दावा त्यांनी केला. कमी जागा लढवून अधिक जागा जिंकणे हाही स्ट्राईक रेट असल्याचे नमूद करत, आमदार नसलेल्या मतदारसंघातही शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राज्यात शिवसेनेचे सध्या ६२ नगराध्यक्ष निवडून आले असून हा आकडा ७० पर्यंत जाईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. यामध्ये शिवसेनेच्या ३३ लाडक्या बहिणी (Ladki Bahin) नगराध्यक्षपदी निवडून आल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
नगर परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने (Maha Vikas Agahdi) पराभव मान्य करून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत, “जे घरी बसले, त्यांना महाराष्ट्राच्या जनतेने कायमचे घरी बसवले,” असा घणाघातही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या एकत्रित बेरजेपेक्षा शिवसेनेच्या नगराध्यक्षांची संख्या अधिक असल्याचे सांगत, शिवसेनेची नाळ सर्वसामान्य जनतेशी जोडलेली असून ती कधीही तुटू शकत नाही, असा ठाम दावा त्यांनी केला. आगामी महापालिका निवडणुकीतही महायुतीचाच भगवा फडकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘आरोग्य आपल्या दारी’ उपक्रमाची घोषणा
मुख्यमंत्री असताना ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबवून साडेपाच कोटी नागरिकांना लाभ दिला होता, असे सांगत, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आरोग्य विभागामार्फत ‘आरोग्य आपल्या दारी’ हा नवा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
सत्कार सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसह छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले.

