पुणे – अहमदनगर जिल्ह्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पारनेरचे तरुण आणि लोकप्रिय आमदार नीलेश लंके यांनी हातातलं घड्याळ सोडत, तुतारी हाती घेतली आहे. पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांनी स्वगृही प्रवेश करतील असं सांगण्यात येतंय. दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या सुजय विखे पाटील यांच्याविरोधात लंके यांना देण्यात येईल, अशी शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर नीलेश लंके शरद पवारांसोबत गेल्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आत्मविश्वास वाढणार आहे.
ही चर्चा सुरु असतानाच शरद पवारांनी पुण्याच्या पत्रकार परिषदेत मात्र नीलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाबाबत माहिती नसल्याचं सांगितलंय. माध्यमातूनच या चर्चा ऐकल्याचंही पवारांनी स्पष्ट केलंय
नीलेश लंकेंची काय पोस्ट?
ही चर्चा सुरु असतानाच नीलेश लंके यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी स्वताचा उल्लेख जनसेवक असा केला आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव त्यांनी पोस्टमध्ये कुठंही घेतलेलं नाहीये. वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छांचे आभार मानणारी ही पोस्ट आहे. मात्र या पोस्टच्या शेवटी त्यांनी घेतला वसा टाकणार नाही, असं एक सूचक वाक्य लिहिलेलं आहे.
नीलेश लंके विरुद्ध सुजय विखे संघर्ष
अहमदनगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी या जिल्ह्याची ओळख आहे. मात्र विखे पाटील भाजपात गेल्यानंतर आता भाजपाचं वर्चस्व असल्याचं मानण्यात येतं. या ठिकाणी सगळ्याच निवडणुकांत विखे विरुद्ध इतर सर्वपक्षीय असा संघर्ष असतो. याही लोकसभा निवडणुकीत विखे विरुद्ध इतर सर्वपक्षीय असा संघर्ष असेल. नीलेश लंके यांना विखेंच्या विरोधकांनी बळ दिल्याचं मानण्यात येतंय.
भाजपातील काही नेत्यांचंही लंकेंना बळ?
नगर जिल्ह्यात काही भाजपाचे नेते, कार्यकर्तेही सुजय विखे यांच्या विरोधात आहेत. त्यात विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांच्या नावाचा प्रामुख्यानं उल्लेख करण्यात येतो. राम शिंदे हेही दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र पक्षांतर्गत संघर्ष नको, म्हणून यावर शिक्कामोर्तब होऊ शकलेलं नाही.
अजित पवार महायुतीत आल्यानंतर त्यांच्यासोबत नीलेश लंकेही महायुतीत आले. मात्र नगर जिल्ह्यात महायुतीतल्या नेत्यांमधील संघर्ष स्पष्टपणे दिसत होता.
आता विखे विरुद्ध लंके अशी लढत अटळ
दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघात यावेळी सुजय विखे विरुद्ध नीलेश लंके अशी लढत होणार, हे स्पष्ट झालेलं आहे. लंके यांनी कर्तृत्ववान आमदार ही ओळख विखेंपुढे आव्हान निर्माण करु शकणारी आाहे.
आणखी २२ आमदार संपर्कात- रोहि्त पवार
अजित पवार यांच्यासोबत महायुतीत गेलेले २०-२२ आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा रोहित पवार यांनी यापूर्वी केलेला होता. लोकसभेनंतर हे आमदार पुन्हा स्वगृही परततील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. लंकेंच्या निमित्तानं या घरवापसीला सुरुवात झाल्याचं मानण्यात येतंय.