ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभा रणसंग्राम : नांदेडमध्ये पुन्हा भाजपचा झेंडा की महाविकास आघाडी खेळणार नवी खेळी?

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपची वाट धरल्यानंतर नांदेडमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालात मोठा बदल पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. नांदेडवर कंट्रोल असलेल्या अशोक चव्हाणांनंतर आता काँग्रेस दुसरा कोणता पर्याय उभा करणार की ही जागा महाविकास आघाडीतील दुसऱ्या घटक पक्षाकडे जाणार याबद्दलची उत्सुकता आहे. भविष्याचे अंदाज बांधण्यापूर्वी आधी इतिहासाकडे डोळसपणे पाहावं लागतं. त्यामुळे गेल्या दोन टर्म नांदेड कोणी गाजवलं, आणि सध्या कोणामध्ये लढत होऊ शकते, याचा घेतलेला धांडोळा…

नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यामुळे नांदेडवर काँग्रेसची पकड राहिली. त्यांच्यानंतर त्यांचे पूत्र अशोक चव्हाण यांनी हा वारसा पुढे चालवला. अशोक चव्हाणांसह त्यांची पत्नी अमीता चव्हाण यांचाही नांदेडच्या राजकीय क्षेत्रात मोठं नाव आहे. त्यांचा जनसंपर्क चांगला असल्याचं म्हटलं जातं.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे नांदेडमध्येही काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. गेल्या निवडणुकीत भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ४,८२,१४८ मतं मिळवून काँग्रेसचे अशोक चव्हाण यांचा पराभव केला. त्यावेळी अशोक चव्हाण यांना ४,४२,१३८ मतं पडली होती. आणि दोघांमधील मतांचं अंतर अवघ्या ४०,०१० इतकं होतं.

२०१४ लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर यावेळी अशोक चव्हाण काँग्रेसमधून ४,९१,२९२ मतांनी विजयी झाले होते. यावेळी भाजपचे डी. बी पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची ४,१०,४५४ मतं पडली होती आणि त्यांच्या मतांमध्ये ८०,८३८ इतकं अंतर होतं.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे भास्करराव बापूराव खतगावकर पाटील ३,४६,२५३ मतांनी विजयी झाले होते. यावेळी भाजपचे संभाजी पवार यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं पडली होती.

अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. त्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघातून कोणाला तिकीट मिळणार याची चाचपणी सुरू आहे. भाजपाचे सध्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पुन्हा संधी मिळणार की महायुतीकडून दुसऱ्या कुणाला संधी मिळणार, याची चर्चा सुरू आहे.

महाविकास आघाडीतून कोणाला संधी?
नांदेड मतदारसंघात दलित आणि मुस्लीम मतदान जास्त आहे. मात्र अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसकडे नांदेडमध्ये उभा करण्यासाठी दुसरा विश्वासार्ह चेहरा दिसत नाही. त्यात शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांचाही या भागात फारसा होल्ड नाही. अशावेळी वंचित यामध्ये एन्ट्री घेऊ शकते का, हादेखील प्रश्न आहे. जर वंचितने महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवली तर प्रकाश आंबेडकर नांदेडवर दावा सांगू शकतात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितचे यशपाल भिंगे नरसिंगराव यांना तिसऱ्या क्रमांकाची (१४.८५ टक्के) मतं मिळाली होती. या मतदारसंघासाठी प्रकाश आंबेडकरांच्या नावाची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांचे समर्थक असलेले काँग्रेसचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.

महायुतीतील या नावांची चर्चा…
भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा संधी मिळू शकते असं सांगितलं जात असताना भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य असलेले डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्याही नावाची चर्चा आहे. माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांच्या सूनबाई आणि काँग्रेसमधून अशोक चव्हाणांसोबत पुन्हा भाजपमध्ये आलेल्या मिनल खतगांवकर यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.

नांदेड उत्तरमध्ये शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर हे आमदार आहेत. तर नायगाव आणि मुखेड मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भोकर, नांदेड दक्षिण आणि देगलूर मतदारसंघावर आता भाजपचं वर्चस्व आहे. जिल्हा परिषद, 16 पंचायत समित्या, 15 नगर परिषदा, 1 महापालिका, 9 विधानसभा मतदारसंघांवर अशोक चव्हाणांचं वर्चस्व मानण्यात येतं.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात