मुंबई- रत्नागिरी सिँधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नसला तरी नारायण राणे यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केलेली आहे. या मतदारसंघातून नारायण राणेंना निवडून देण्यासाठी त्यांचे पुत्र निलेश आणि नितेश हेही ठिकठिकाणी प्रचारसभा घेतायेत. त्यातल्या एका सभेत राणेंना मोठ्या लिडनं विजयी करा, असं आवाहन नितेश राणेंनी केलं. मात्र लिड कमी मिळेल त्या ठिकाणी विकास निधी कमी मिळाला तर मग तक्रार करु नका, असा धमकीवजा इशाराच त्यांनी दिलाय. त्यांच्या या वक्तव्यावर आता टीकेची झोड उठताना दिसतेय.
राणेंना विजय पाहिजे म्हणजे पाहिजेच
गुरुवारी पार पडलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात नितेश राणे बोलत असताना त्यांनी ही इशाऱ्याची भाषा केली आहे. सरपंचांसहित कार्यकर्त्यांनी गेल्या निवडमुकीवेळी जी यंत्रणा राबवली होती, तीच यंत्रणा राबवण्याचे आदेश त्यांनी दिलेत. येत्या ४ जूनला मतमोजणीच्या दिवशी सगळ्यांचा हिशोब होणार असल्याचं विधानंही त्यांनी केलंय. हवं तसं लिड राणेंना मिळालं नाही तर विकास निधी कमी मिळाल्याची तक्रार करु नका, असा सज्जड दमच त्यांनी सरपंच आणि कार्यकर्त्यांना दिलाय. नारायण राणे यांचा विजय झालाच पाहिजे, अशी भूमिका नितेश राणेंनी घेतलीय.
मोदींना पंतप्रधान करण्याची घाई
तर याच सभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मतदारांना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याची घाई असल्याचं विधान केलंय. मोदींच्या बाजूनं वन साीड मतदान या निवडणुकीत होईल असं भाकितही त्यांनी वर्तवलेलं आहे.