मुंबई – धाराशिवमधील बडे नेते पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा आणि भाजपाचे तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह यांच्या पत्नी अर्चना राणा जगजीतसिंह पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. धाराशिवमधून अर्चना पाटील यांना ओमराजेंच्याविरोधात उमेदवारी जाहीर झालेली आहे. यातून पद्मसिंह विरुद्ध पवनराजे यांच्यातील खानदानी दुष्मनीचा पुढचा अध्याय लिहिला जाणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत भाजपाचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी घड्याळ हातावर बांधलंय. अर्चना पाटील या धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपसभापतीही राहिलेल्या आहेत. लेडिज क्लबसारख्या संस्थाही त्यांच्या ताब्यात असून, जिल्ह्यात महिलांमध्येही त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. धाराशिव मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासमोर अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. ओमराजे विरुद्ध अर्चना पाटील ही लढत वहिनी विरुद्ध दीर अशी होणार आहे. अर्चना पाटील यांना महायुतीची उमेदवारी मिळाली असली तरी धाराशिवची जनता आपल्यासोबतच आहे असा दावा ओमराजेंनी केला आहे. गेल्या पाच वर्षांत आपण केलेलं काम केवळ १८ दिवसांत बदलता येणार नाही, असंही त्यांनी म्हटलेलं आहे.
पद्मसिंह पाटील विरुद्ध पवनराजे संघर्ष
या लढतीमुळं पद्मसिंह पाटील विरुद्ध पवनराजे निंबाळकर या खानदानी दुष्मनीचा पुढचा अध्याय लिहिला जाणार आहे. दोन चुलत भावांमधल्या संघर्षाचा तिढा आता पुढच्या पिढीत येऊन पोहचलेला आहे.
काय आहे इतिहास?
- पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर हे एकमेकांचे चुलतभाऊ
- तेरणा साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहारावरुन दोघांमध्ये वितुष्ट
- 2004 साली पद्मसिंह विरुद्ध पवनराजे अशी विधानसभेची लढत
- 2004 पूर्वी सहा वेळा उस्मानाबादचे आमदार राहिलेल्या पद्मसिंह पाटलांच्या मताधिक्यात घट
- शिवसेनेच्या पाठिंब्यानं उभ्या राहिलेल्या पवनराजेंचा पराभव
- पवनराजे निंबाळकारांनी नंतर काँग्रेसमध्ये केला प्रवेश
- 3 जून 2006 रोजी नवी मुंबईत पवनराजेंची गोळ्या झाडून हत्या
- पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजेंच्या हत्येचा आरोप
- 2009 साली पवनराजे हत्येप्रकरणी सीबीआयकडून पद्मसिंहांना अटक
- 2009 साली पद्मसिंहांना जामीन मंजूर
- 2009 विधानसभा निवडणुकीत पवनराजेंचे पुत्र ओमराजे आणि पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजीतसिंह यांच्यात लढत
- 2009 विधानसभा निवडणुकीत ओमराजे निंबळाकर विजयी
- 2014 विधानसभेत राणा जगजीतसिंह पाटील विजयी, ओमराजेंचा पराभव
- 2019 साली ओमराजे विरुद्ध राणा जगजीतसिंह यांच्यात लोकसभेसाठी संघर्ष
- मोदींच्या सभेनंतर 2019 साली शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विजयी
- 2024 साली पुन्हा दोन्ही घराणी आमनेसामने
आता महायुतीत आलेल्या अर्चना पाटील आणि ओमराजे यांच्या लढतीनं या दोन घराण्यातील संघर्ष पुढच्या टप्प्यात जाणारेय.
अजित पवारांसाठीही ही लढत महत्त्वाची
अजित पवार आणि पद्मसिंह पाटील यांच्यातही कौटुंबिक नातं आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत.त्यामुळं एकीकडं बारामतीत पत्नी सुनेत्रा पवारांची लढत आणि दुसरीकडे पत्नीच्या माहेरची अर्चना पाटील यांची लढत अजित पवार यांच्यासाठी महत्त्वाची असणार आहे.
अर्चना पाटील यांच्या उमेदवारीनं महायुतीलल्या धाराशिव जागेवरचा तिढाही सुटलाय. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह यांच्या पराभवाचा वचपा, या निवडणुकीत अर्चना पाटील काढणार का, याकडं आता सगळ्याचं लक्ष असेल.
हेही वाचाः‘वंचितची भूमिका भाजपाला अनुकूल’, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा गंभीर आरोप, काय आहे प्रकरण?