X: @therajkaran
लोकसभेची निवडणूक (Lok Sabha elections) लढवण्यासाठी पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार (Sharad Pawar Group) गटासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये, घेतलीच तर त्यांची आमदारकी जाणार, असा दमच त्यांनी दिला आहे. त्यांना शरद पवारांसोबत जायचं असेल तर लंके यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असे अजित पवार म्हणाले.
शरद पवार गटाकडे उमेदवार नसल्याने त्यांनी निलेश लंके यांच्या नावाची चर्चा सुरु केली आहे. ज्यावेळी आम्ही वेगळी भूमिका घेतली, त्यावेळी हेच लोक सांगत होते की यातील कुणालाही परत घेतलं जाणार नाही. आता सहाच महिन्यात त्यांनी ही भूमिका बदलल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच समोरचे लोक आता आमच्या नेत्यांना बोलवत आहेत, असा टोला अजित पवार यांनी शरद पवार गटाला दिला आहे. पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली तर पक्षांतरबंदी कायद्यान्वये आमदारकी जाते. लंके हे त्या ठिकाणच्या स्थानिक राजकारणावर नाराज असल्याची माहिती असून आपण त्यामध्ये लक्ष घालणार असल्याचंही अजित पवार म्हणाले.
विशेष बाब म्हणजे, राष्ट्रवादीत एकत्रित असताना आमदार लंके यांचे शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule) व अजित पवार (Ajit Pawar) या तिन्ही नेत्यांशी घनिष्ठ संबंध होते. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर ते प्रथम शरद पवार गटात गेले, नंतर काही दिवसांतच अजितदादा गटात परतले, आता पुन्हा शरद पवार गटात जात आहेत. आमदार लंके शिवसेनेचे पारनेर तालुकाध्यक्ष होते. तत्कालीन शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या विरोधात बंडखोरी केल्याच्या प्रकरणातून त्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले व पारनेर -नगर विधानसभा निवडणुकीत विजयी झाले.
गेल्या काही दिवसांपासून लंके लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यादृष्टीने आता अजित पवार यांना सोडून शरद पवार गटाची (Sharad Pawar) साथ देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लवकरच ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चा आहेत.