By संतोष पाटील
पालघर: जनतेचा कौल लक्षात घेऊनच जिजाऊ संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर राजकीय पद गरजेचे असते यावर जिजाऊ संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे यांनी भर दिला. आज कोणतेही पद नसताना स्वकमाईतून लाखो लोकांची सेवा करून लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणला. त्यामुळे आता जिजाऊ संघटनेचा प्रतिनिधी म्हणून पालघर जिल्ह्यात सामाजिक जाण असलेले उच्चशिक्षित आणि सामाजिक बांधीलकी मानणाऱ्या कल्पेश भावर यांना उमेदवारी देण्याची घोषणा सांबरे यांनी केली.
पालघर लोकसभा मतदारसंघातून जिजाऊ संघटनेच्या वतीने कल्पेश भावर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने येथे चौरंगी लढत होणार आहे. निलेश सांबरे यांनी ही उमेदवारी जाहीर करून पुढच्या पाच वर्षात पालघर जिल्ह्याचा कायापालट करण्याची ग्वाही दिली. परिवर्तनासाठी माझ्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून पालघर लोकसभा मतदारसंघात जिजाऊ संघटना निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांबरे यांनी जाहीर केले होते. त्यासाठी भिवंडी, वासिंद, वाडा, पालघर, ठाणे, रत्नागिरी अशा विविध ठिकाणी निर्धार मेळावे घेतले. या मेळाव्यांना लाखोंच्या संख्येने उपस्थिती होती. या मतदारसंघातून विद्यमान खासदार राजेंद्र गावित ही महायुतीकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. राजेंद्र गावित हे पुन्हा निवडणूक लढवतील अशी चर्चाही आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर बहुजन विकास आघाडी याठिकाणी उमेदवारी जाहीर करत असल्याने या ठिकाणी चौरंगी लढत होऊ शकेल.