बारामती : राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कातील गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर ते महायुतीचा प्रचार करणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकावर आणि बॅनरवर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा फोटो दिसल्याने अनेक पश्न उपस्थित केले जात आहेत. बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मनसेचे राज ठाकरे यांचा देखील फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघ हा महायुतीसह महाविकास आघाडीसाठीही प्रतिष्ठेचा ठरला आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ते महायुतीसोबत निवडणूक लढवणार असल्याचे आडाखे बांधले जात होते. उलटपक्षी राज ठाकरे यांचा मनसे शिंदेच्या शिवसेनेत सामील करून त्यांना पक्षप्रमुखपद देण्याचीही शक्यता व्यक्त केली जात होती, मात्र राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्यातच्या भाषणा या शक्यता चुकीच्या असल्याचं सांगितलं. भाजपकडून कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर होती, मात्र माझा पक्ष फुटू देणार नसल्याचं राज ठाकरे म्हणाले होते.
मात्र नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकेची झोड उठवणारे राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींसाठी महायुतीला पाठिंबा देण्याचं जाहीर केल्यानंतर विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंनी घेतलेल्या बाजूवरुन टीकास्त्र सोडलं. दरम्यान राज ठाकरे आणि भाजप यांच्यात लोकसभेत महायुतीचा प्रचार आणि विधानसभेत जागांची डिल झाल्याच्याही चर्चा आहेत. त्यातच सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकावर राज ठाकरे यांचा फोटो पाहून या सभांमध्ये ठाकरे पवारांचा प्रचार करीत अशी शक्यता दाट झाली आहे.