मुंबई – महायुती आणि महाविकास आघाडी यांचं जागावाटप जवळपास पूर्ण झाल्यानंतर आता राज्यात जोरदार प्रचाराला सुरुवात झालेली आहे. अशात आता नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसतायेत. मुंबईत तर ठाकरेंच्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याची आणि टीका करण्याची एकही संधी भाजपा नेते सोडताना दिसत नाहीयेत. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी अशाच प्रकाराने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागलीय.
उद्धव ठाकरेंच्या श्रेयवादावरुन टीका
मुंबईत जी कामं झाली त्याचं उद्धव ठाकरे श्रेय घेतात. हे करुन दाखवलं नावानं त्यांचं कॅम्पेन करण्यात येतं. मात्र जे प्रकल्प पूर्ण झाले नाहीत, ज्यांना उद्धव ठाकरे यांनी विरोध केला, त्या अपूर्ण प्रकल्पांची जबाबदारी उद्धव ठाकरे घेणार का, असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे. २५ वर्ष ठाकरेंच्या हाती मुंबई महापालिका होती, या काळात शहराचा विकास, कायापालट त्यांना का करता आला नाही, हे अपयश कुणाचं, असा सवालही आशिष शेलार यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी गद्दारी केली. त्यामुळेच एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार हे भाजपासोबत आल्याची टीकाही शेलार यांनी केली आहे.
आदित्य ठाकरेंना मुंबईची संस्कृती माहिती आहे का?
आदित्य ठाकरे वरळीतून आमदार आहेत. गिरणी कामगार आणि झोपडपट्टींच्या प्रश्नांवर ते बोलत असतात. मात्र आदित्य यांना मुंबईचे प्रश्न, संस्कृती याची किती माहिती आहे, असा सवालही शेलार यांनी विचारला आहे.
आदित्य ठाकरेंच्या अहंकारामुळं युती तुटली
आदित्य ठाकरे हे २०१४ आणि २०१९ च्या जागावाटपावेळी अहंकारी भूमिकेत होते. २०१९ साली त्यांनी परस्पर १५१ चा नारा दिला, त्यावेळी भाजपाला विचारणा करण्यात आली होती का, असा सवालही शेलार यांनी उपस्थित केलाय. चर्चेसाठी आलेल्या काही वरिष्ठ भाजपाच्या नेत्यांशी आदित्य ठाकरे यांनी केलेलं वर्तन हे आक्षेपार्ह होतं. त्यांच्या या अहंकारामुळेच युती तुटली असा आरोपही शेलार यांनी केलाय.
हेही वाचाःठाकरे करणार पवारांचा प्रचार; सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकावरुन चर्चेला उधाण