मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha constituency) राजकीय घडामोडीना वेग आला आहे . या पार्श्वभूमीवरच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे. माढ्याचे धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil )यांनी भाजपाच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून लवकरच ते राष्ट्रवादीत दाखल होऊन रणजीतसिंह निंबाळकरांविरोधात तुतारी फुंकणार असलयाचे जवळपास निश्चित झालं आहे .त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या खेळीने भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे .
भाजपने या मतदारसंघातून रणजीत सिंह निंबाळकर यांना महायुतीचे उमदेवारी दिली आहे . त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. त्यानंतर त्यांनी गुरुवारी पुणे शहरात शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते भाजपमधून बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट झाले. आता ते सरळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार आहेत.उद्या शनिवारी धैर्यशील मोहिते पाटील अकलूजमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. ते माढा लोकसभा मतदार संघातून तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे.
दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, मी भारतीय जनता पार्टी, सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची माझ्याकडे जबाबदारी आहे. या कार्यकाळात जिल्हा, मंडळ कार्यकारिणी, मोर्चा, प्रकोष्ठ इत्यादी संघटना रचना गठीत करुन कार्यान्वित करण्याचं कार्य केले. तसेच शक्तीकेंद्र, सुपर वॉरीयर, बूथ रचनाही सक्रिय केल्या. वेळोवेळी विविध कार्यक्रम आयोजित करुन संघटना व बूथच्या माध्यममातून जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे कार्य केले. आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास व दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो व आपणांस कळवू इच्छितो की मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा, तसेच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, त्याचा स्वीकार व्हावा ही विनंती.
याआधी पाच वर्षांपूर्वी शरद पवारांना विरोध करून राष्ट्रवादीकडून माढा काढून घेतलेल्या मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा पवारांना साथ द्यायचं ठरवलं आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव माहिती होतं, आता धैर्यशील मोहिते पाटलांचंही नाव चर्चेत आलं आहे.