मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Lok Sabha constituency) ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil )यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या विशाल पाटील (Vishal Patil) यांना या मतदारसंघात धक्का बसला होता . आता पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून त्यांना फटका बसला आहे . कारण या मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Saghtana) राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना (Mahesh Kharad) उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे यावेळी स्वाभिमानीची मदत विशाल पाटील यांना मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या अनेक दिवसापासून स्वाभिमानी पक्षाचा जिल्हाध्यक्ष तसेच कणखर नेता म्हणून महेश खराडे यांनी चांगल्या पद्धतीने काम केले आहे. म्हणूनच आम्ही शेतकरी असणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाने ही जागा लढवून जवळपास साडे तीन लाख मते मिळवली होती. यावेळी यापेक्षा अधिक मते मिळवून महेश खराडे विजयी होतील असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान याआधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना स्वाभिमानीच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागली होती. मात्र या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभा राहताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्ह्यातील ताकदीची आपल्याला मदत होईल अशी विशाल पाटील यांची अपेक्षा होती.मात्र यंदा स्वाभिमानीनेच उमेदवारी जाहीर केल्याने त्यांना आता फटका बसला आहे .दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी याबाबत म्हणाले कि , आमचा उमेदवार फाटका माणूस आणि गरीब शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे ही निवडणूक ‘एक व्होट एक नोट’ या तत्त्वावर लढवली जाणार आहे. आम्हाला पक्षांपेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. महायुती असो अथवा महाआघाडी ज्या ज्या वेळी या पक्षांनी शेतकरी विरोधी भूमिका घेतली त्यावेळी कोणताही विचार न करता आम्ही बाहेर पडलो असलयाचे त्यांनी सांगितले . .
दुसरीकडे विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्यासमोर वंचितचा पर्याय देखील उपलब्ध असल्याची चर्चा सुरू झाली होती.आता स्वाभिमानीच्या धक्क्यानंतर विशाल पाटील वंचितचा मार्ग निवडणार का या चर्चाना आता उधाण आलं आहे .