X: @therajkaran
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर आरोप……!
मुंबई, दि.२४(अनंत नलावडे)- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांना त्यांच्या बारामती ऍग्रो कंपनीतल्या कथित गैर व्यवहार प्रकरणी ईडी कडून नोटीस बजावल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी बुधवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना तीव्र संताप व्यक्त करत,’ आता कोणतीच तपास यंत्रणा स्वतंत्र राहिलेली नाही,’ अशा शब्दात केंद्र सरकारवर कोरडे ओढत, एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने काही दिवसांपूर्वी आ. रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो या कंपनीवर छापेमारी करत तपासाला सुरुवात केली होती.मात्र नंतर ईडी त्यांना अधिक चौकशी साठी मंगळवारी रीतसर नोटीस बजावली. त्यानूसार आज आ. रोहित पवार मुंबईतल्या ईडी कार्यालयांत दाखल झाल्यानंतर येथील राजकीय वर्तुळातुन त्यावर विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत हे गप्प कसे बसतील. त्यांनी थेट प्रसार माध्यमांशी संपर्क साधून यावर आपला संताप तरं व्यक्त केलाच पण पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही कठोर शब्दात टिका केली. ‘सध्या सर्वच तपास यंत्रणा या भाजपाच्या शाखा झाल्या आहेत.’ लोकशाहीसाठी हुकूमशाहीच्या विरोधात जे जे आवाज उठवतील त्यांना भाजप ईडी व अन्य तपास यंत्रणांच्या मार्फत त्रास दिला जातो. मी सुध्दा त्या त्रासातून गेलो आहे, आणि अजूनही सुरूच आहे. हेच काय सध्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा ईडीला घाबरूनच तिकडे गेले आहेत. मात्र ईडी आता तिकडे नोटीस न मारता किशोरी पेडणेकर आ. राजन चव्हाण, रविंद्र वायकर, यांना नोटिसा पाठवत आहे. हे कमी म्हणून की काय ईडी या संजय राऊतलाही अटक करते. त्यामुळे जे कोणी भाजपचा भ्रष्टाचार बाहेर काढतात त्याच्या विरोधात आवाज उठवतात त्यांना आत टाकले जात आहे. आणि म्हणूनच ईडी सहीत सर्वच तपास यंत्रणा या आता भाजपाच्या शाखा झाल्या आहेत, असे सांगत राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पक्षांतर ही सुध्दा ई डी चीच कृपा…..
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पाडून स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस हे संस्थान उभारून आमदार पळऊन सत्ताधारी भाजपाशी हातमिळवणी केली ती सुद्धा ईडीचीच कृपा आहे. आता त्यांना शांत झोप लागत असेल, अशा काहीशा खोचक शब्दात त्यांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. तो मुलुंडचा नागडा पोपट त्याने ज्या ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते आज सर्व भाजप मध्ये आहेत, अशा शब्दात त्यांनी किरीट सोमय्या यांनाही लक्ष केले.
आम्ही तब्बल ८ हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढला, सरकार मधील अनेक खात्यांचे घोटाळे काढले, पण ईडी त्यांना नोटिसा पाठवत नाही. मात्र आमच्या युवा सेनेचा पदाधिकारी सुरज चव्हाण यांना अटक करते. यावरूनच माझा थेट आरोप आहे की ईडी सुद्धा भाजपचीच एक शाखा आहे, असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांनवर थेट निशाणा साधला.