मुंबई
पुण्यात जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये उपोषण आंदोलन करण्यापासून मनोज जरांगेंना रोखण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठा आंदोलक उद्या मुंबईत दाखल होणार आहेत.
याशिवाय ओबीसी महासंघानेही जरांगे पाठोपाठ मुंबईत येऊन आंदोलन करणार असल्याचं सांगितलं आहे. आम्हीही २६ जानेवारीला गाढवे, डुकरे, घोडे घेऊन मुंबईत धडकणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. ओबीसींकडे कार, जीप, ट्रॅक्टर नसल्याने गाढवे, डुकरे, घोडे घेऊन मुंबईत आंदोलन करणार असल्याचं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बंगला असतानाही झोपडी लिहिणे, महागड्या गाड्या-संपत्ती आदी माहिती लपवण्याचा प्रकार मराठा समाज सर्वेक्षणात सुरू आहे, अशांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मराठा समाजात ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्याचं सांगितलं जात आहे, या नोंदी कशा आढळल्या याचा तपशील देण्यास सरकार तयार नाही. हा ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार असल्याची टीका ओबीसी नेत्यांकडून केली जात आहे.
सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या जन्मगावी सातारा येथे शेतीकामात दंग आहेत. सरकार सकारात्मक असताना आंदोलनाची गरज नाही, सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशनात आरक्षणाबद्दल निर्णय घेतला जाईल, न्यायालयात टिकणारं आणि कोणत्याही समाजावर अन्यया न करणारं आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न…
आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांना नोटीस देण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहे. आझाद मैदानाची क्षमता पाच हजार आहे. परंतु लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यामुळे आझाद मैदानाच्या क्षमतेची मनोज जरांगे यांना जाणीव करुन द्या, असे आदेश न्यायालयाने दिले आहे.