मुंबई
लोकसभा जागावाटपासंदर्भात मुंबईत आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. कोण किती जागांवर निवडणूक लढवणार यावर अद्याप निर्णय झालेला नाही. वंचित बहुजन आघाडी मविआत आल्यास हा गुंता अधिक वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
मविआच्या या बैठकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र आव्हाड, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित असतील. शिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.
२४ जानेवारी जागावाटपावरुन तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस पक्षात फाटाफूट झाल्याने ममता बॅनर्जींनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली, पंजाबमध्येही ही निवडणूक स्वबळावर लढवली जाणार असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत मविआमध्ये नेमकं काय होणार हे येत्या काही तासात समोर येईल.
शिवसेना २३ जागांवर ठाम असून काँग्रेसलाही जास्त जागा हव्या आहेत. प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांना तीन जागा देण्याबाबत चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाकडून त्यांच्या कोट्यातील दोन जागा प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार गटाकडून एक जागा राजू शेट्टी यांना देण्याचा विचार सुरू आहे.