पुणे
पुण्यातील राजकीय वर्तुळात राजकारण्यांबरोबरच गुन्हेगारी क्षेत्राशीसंबंधित व्यक्तींचा प्रभाव पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर कुख्यात गुंड गजा मारणे याने सपत्नीक अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीवरुन अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत.
गजा मारणे याने पत्नीसह पार्थ पवारांची भेट घेतली. त्याची पत्नी जयश्री मारणे माजी नगरसेविका आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा खून करण्यात आला होता. मोहोळची पत्नी
स्वाती मोहोळ पुण्यातील भाजपच्या पदाधिकारी आहे. पतीच्या खुनानंतर तिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. तर नितेश राणे यांनीही मोहोळ कुटुंबाची भेट घेतली होती. तो हिंदूत्ववादासाठी काम करीत असल्याचंही नितेश राणे यांचं म्हणणं आहे.
कोण आहे गजा मारणे?
गजा उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याचा मुळशी तालुक्यातील एका छोट्या गावात जन्म झाला. पुण्यातील कोथरूड परिसरातील शास्त्रीनगर येथे राहायला आल्यावर तो गुन्हेगारीकडे वळला. पुण्यातील घायवळ गँग आणि मारणे गँग यातील वर्चस्वाचा वाद झाला होता. त्यानंतर अमोल बधे आणि पप्पू गावडे हत्या प्रकरणात गजा मारले याला अटक झाली होती. तो ३ वर्षे येरवडा तुरुंगात होता. मात्र, सबळ पुराव्या अभावी गजा मारणे याची मुक्तता झाली. जेलमधून सुटल्यावर जंगी मिरवणुक काढल्यामुळे गजा मारणे चर्चेत आला होता. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या 4 कोटी रुपयांच्या बदल्यात 20 कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाचं अपहरण केल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेनं गुंड गजानन मारणेच्या मुसक्या आवळल्या होत्या. मारणे टोळीवर आजवर २३ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तर गजा मारणेवर ६ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.