मुंबई – भाजपाचे विदर्भातील वरिष्ठ नेते, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार असतील अशी जोरदार चर्चा होती. त्यांच्यासोबतच माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र भाजपानं लोकसभा निवडणूक निरीक्षकांची यादी जाहीर केल्यानंतर ही दोन्ही नावं चर्चेतून मागे पडल्याचं मानण्यात येतंय. अशात भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरु झालेली आहे.
सध्या काय आहे मतदारसंघाची परिस्थिती?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या लाटेत काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर निवडून आले होते. त्यांनी हंसराज अहिर यांचा पराभव केला होता. धानोरकर यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली नाही. आता धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या जागी उभ्या राहतील अशी शक्यता आहे.
मुनगंटीवार यांच्याऐवजी दुसरा उमेदवार का?
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलण्यामागे जातीय समीकरण असल्याचं सांगण्यात येतंय. या मतदारसंघात कुणबी मतदान मोठ्या प्रमाणात आहे. एकूण २० लाख मतांपैकी ७ लाख मतं ही कुणबी समाजाची आहेत. सुधीर मुनगंटीवार हे कोमटी आहेत. तर प्रतिभा धानोरकर या कुणबी आहेत. त्यामुळं निवडणुकीत मुनगंटीवार उभे राहिल्यास पराभव स्वीकारावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुनगंटीवार यांनी निवडणूक लढण्यास नकार दर्शवल्याची माहिती आहे. त्यामुळे या मतदारसंघातून अशोक जिवतोडे यांना संधी मिळेल असं सांगण्यात येतंय. अशोक जिवतोडे हे या भागातील मोठं प्रस्थ असून, त्यांची जनता शिक्षण संस्था महत्त्वाची मानण्यात येतेय.