मुंबई – लोकसभेसाठी महयुतीत जागावाटपावरुन चुरस असल्याचं दिसतंय. एकीकडे भाजपाला लोकसभेत ३७० प्लस आकडा गाठायचा असल्यानं, राज्यातून जास्तीत जास्त खासदार कमळाच्या चिन्हावर निवडून जावेत, यासाठी त्यांचा आग्रह आहे. तर दुसरीकडे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष जास्त जागांची मागणी करताना दिसतायेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा तर ४८ पैकी १३ लोकसभा मतदारसंघावर डोळा असल्याचं सांगण्यात येतंय.
कोणत्या १३ लोकसभा मतदारसंघांसाठी अजित पवार गट इच्छुक?
- शिरुर
- बारामती
- सातारा
- रायगड
- परभणी
- बुलढाणा
- धाराशिव
- भंडारा-गोंदिया
- यवतमाळ-वाशिम
- नाशिक
- कोल्हापूर
- गडचिरोली
- मावळ
यासह अमरावती लोकसभा मतदारसंघात 2019 लोकसभेची निवडणूक नवनीत राणा या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं जिंकल्या असल्यानं, त्याही जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा डोळा असल्याचं मानण्यात येतंय. शिंदेंच्या शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत.
किमान सहा जागांसाठी आग्रही
अमित शाहा दोन दिवसांच्या मराठवाडा, खान्देश, विदर्भ दौऱ्यावर येतायेत. त्यानंतर उद्या मंगळवारी महायुतीच्या नेत्यांशी त्यांची चर्चा होणार आहे. या बैठकीत जागावाटप नक्की होईल, असं सांगण्यात येतंय. या चर्चेत अजित पवार 13 जागांची मागणी करण्याची शक्यता आहे. त्यात किमान सहा जागा तरी अजित पवारांच्या गटाला मिळाव्यात, यासाठी आग्रही भूमिका राहणार आहे.
लोकसभेसाठी हार्ड बार्गेनिंग करुन पदरात फारशा जागा पडल्या नाहीत, तर याच बैठकीत विधानसभेच्या जागांची मागणी करण्यात येण्याची शक्यता आहे. महायुतीत 80 ते 90 जागा मिळाव्यात, यासाठी अजित पवार गट आग्रही राहील असं सांगण्यात येतंय.
हेही वाचा :जागावाटपावरुन महायुतीतही अस्वस्थता, शिंदेंच्या शिवसेनेपाठोपाठ अजित पवार गटही आक्रमक