X: @therajkaran
मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला राम राम ठोकल्यानंतर काँग्रेसचे जुने नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी देखील काँग्रेसची साथ सोडली. असे एकापाठोपाठ एक धक्के काँग्रेसला बसत असतानाच आता परत एक नेता भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.
काँग्रेसचे तीन वेळा खामगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले दिलीप सानंदा (Dilip Sananda) हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Former Mla of Khamgaon to join Bjp) गेल्या अनेक दिवसापासून दिलीप सानंदा हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होत आहे. त्यांनी देखील या चर्चांना दुजोरा दिला आहे. दिलीप सानंदा हे दिवंगत विलासराव देशमुख यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जात होते. मात्र देशमुख यांचे निधन झाल्यापासून पक्षात त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे.
दिलीप सानंदा यांनी १९९९ साली खामगाव विधानसभेची निवडणूक लढवली, तेव्हापासून ते सलग २००९ पर्यंत काँग्रेसचे आमदार राहिले. मात्र २०१४ साली मोदी लाटेत भाजपचे आकाश फुंडकर (Akash Fundkar) यांनी त्यांचा पराभव केला आणि २०१९ साली त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पक्षात सक्रिय नसलेले दिलीप सानंदा हे आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.