बीड
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. पंकजा मुंडे अध्यक्ष असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे. २०३ कोटींच्या थकीत कर्जप्रकरणी युनियन बँकेने या कारखान्याचा लिलाव करण्याचं ठरवलं आहे. या महिन्यात २५ तारखेला ई-लिलाव होणार आहे.
काही महिन्यांपूर्वी १९ कोटींच्या थकित करापोटी जीएसटी विभागानेही या कारखान्यावर कारवाई केली होती. विशेष म्हणजे गेल्या वर्षी केंद्राने काही कारखान्यांना अर्थसाहाय्य केले होते. वैद्यनाथ कारखान्याचा प्रस्ताव देऊनही पंकजांना नाकारण्यात आलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, या कारखान्याच्या कौठाळी व पांगरी येथील ६७ हेक्टर शेतजमिनीसह याच दोन गावातील २४ हेक्टर बिगरशेती जमिनीचाही लिलाव होणार आहे. याशिवाय साखर प्लांट कारखान्याची इमारत, जुना डिस्टिलरी प्रकल्प, नवा डिस्टिलरी प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प, निवासी क्वार्टर्स, जनरेशन प्लँट आणि प्लँट मशिनरींचा लिलाव केला जाणार असल्याचं कारखान्याला पाठवलेल्या नोटीसीत म्हटलं आहे.