मुंबई – लोकसभेच्या निकालानंतर राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. मात्र त्याआधीच राज्यात विधान परिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election 2024) रणधुमाळी सुरू झाली आहे . जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे.यासाठी सर्व राजकीय पक्ष कामाला लागले असून भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, डॉ. परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता त्यांना मंत्रिपद मिळणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे .
लोकसभेच्या निवडणुकीत बीड मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडे यांचा ६ हजार ५८५ मतांनी पराभव केला. त्यानंतर आता आगामी विधानपरिषदेसाठी संधी त्यांना देण्यात आली आहे . गेल्या पाच वर्षांपासून त्या सक्रीय राजकारणातून बाहेर होत्या. २०१९ मध्ये विधानसभेची उमेदवारी देण्यात आली नव्हती त्यानंतर आता त्यांना नुकतीच लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. परंतु त्यात त्यांचा पराभव झाला त्यानंतर पुन्हा पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन केल जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. अखेर आता विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान याआधी विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली असून पुढील महिन्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीही निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपकडून विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी दहा नावांची चर्चा सुरू झाली होती. मात्र आज पाच नावे जाहीर करण्यात आली.आता आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता पंकजा मुंडे सारखा ओबीसी चेहरा राज्यात भाजपसाठी लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.