मुंबई
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी आज महाविकास आघाडीच्या बैठकीत जाण्यास नकार दिला आहे. याचं स्पष्टीकरण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे. याशिवाय या पत्रात त्यांनी नाना पटोलेंनाही सुनावलं आहे.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज दुपारी एक पत्र सोशल मीडियावरुन शेअर केलं होतं. यात त्यांनी प्रकाश आंबेडकरांना आज मविआच्या बैठकीत उपस्थित राहण्याचं निमंत्रण पाठवलं होतं. या पत्रात नाना पटोले, जयंत पाटील आणि संजय राऊतांची स्वाक्षरी असल्याचंही दिसत आहे. या पत्राला प्रत्युत्तर देताना प्रकाश आंबेडकरांनी बैठकीस येण्यास नकार दिला आहे. ‘असं वाटतंय की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसोबत मनाचे खेळ खेळत आहात किंवा तुमच्या डोक्यात लोचा झाला आहे.’ अशा शब्दात तिखट प्रतिक्रिया दिली.
जोपर्यंत त्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे किंवा सोनिया आणि राहुल गांधी यांसारख्या मविआ मित्रपक्षांचे अध्यक्ष निमंत्रित करत नाहीत तोपर्यंत ते बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं आंबेडकरांनी जाहीर केलं आहे.
नाना पटोलेंनी प्रसिद्ध केलेल्या त्या पत्रात दिल्यानुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस येऊन लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा करीत आहेत. वंचित बहुजन आघाडी राज्यातील महत्त्वाचा घटक असून २५ जानेवारी रोजी होणाऱ्या चर्चेत वंचित आघाडीने सहभागी व्हावे, अशी सगळ्यांची इच्छा आहे. कृपया वंचित तर्फे महत्त्वाचे नेते आपण आजच्या बैठकीसाठी पाठवावे ही विनंती. या पत्रात पत्ता आणि वेळही देण्यात आली आहे.
https://twitter.com/Prksh_Ambedkar/status/1750451704477483217/photo/1
प्रकाश आंबेडकरांचं प्रत्युत्तर…
असं वाटतंय की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसोबत मनाचे खेळ खेळत आहात किंवा तुमच्या डोक्यात लोचा झाला आहे. एकीकडे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी मंगळवार २३ जानेवारी रोजी काँग्रेस भवन पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टपणे म्हटले की निवडणुका जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करण्यात येईल, जिथे तुम्ही बाजूलाच बसला होतात. AICC किंवा काँग्रेस हाय कमांड ने महाराष्ट्रात युतिसंदर्भात निर्णय घेण्याची परवानगी तुम्हाला दिली आहे का? असा सवाल आंबेडकरांनी यावेळी उपस्थित केला.