नवी दिल्ली : आपण घेतलेल्या निर्णयांवर कुणीही घाबरण्याची गरज नाही, असं मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. राम मंदिर, सनातन धर्म, इलेक्टोरल बाँड, केंद्रीय. तपास यंत्रणांचा वापर, भारताचा पुढचा रोडमॅप अशा अनेक बाबींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलंय. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवरची त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे.
पुढच्या २५ वर्षांचा रोडमॅप
२०२४ नव्हे तर २०४७ चा रोडमॅप आपल्याकडे तयार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे. पुढच्या २५ वर्षांत काय़ करणार, पुढच्या पाच वर्षांत काय करणार आणि पुढच्या १०० दिवसांत काय करणार, या तीन टप्प्यात पुढच्या देशाच्या वाटचालीबाबत रोडमॅप तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. २०४७ ही आपल्यासाठी मोठी संधी असल्याचं सांगत, त्या दृष्टीने वाटचाल गरजेची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. हा रोडमॅप तयार करताना अनेक अधिकारी, तज्ज्ञ, राजकीय नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येतील, असंही त्यांनी सप्ष्ट केलेलं आहे.
इंदिरा गांधींवर टीका
सहा दशकं या देशावर काँग्रेसचं राज्य होतं. त्या तुलनेत गेल्या १० वर्षांत मोदी सरकारच्या कामाची तुलना केली तर सर्वाधिक गतीनं सरकारनं काम केल्याचा दावा मोदी यांनी केलाय. इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावच्या घोषणेची आठवण त्यांनी करुन दिली. मात्र एका झटक्यात गरिबी हटवण्यात त्यांना अपयश आल्याचं त्यांनी सांगितलं.
राममंदिर प्राणप्रतिष्ठेचं राजकारण
राम मंदिराच्या प्रामप्रतिष्ठेचं राजकारण कुणी केलं असा सवाल नरेंद्र मोदी यांनी केलाय. सत्तेत नसल्यापासून हा मुद्दा होता. निकाल आल्यानंतरही त्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता राम मंदिराचं निर्माण झालंय, विरोधकांच्या हातून हा मुद्दा पूर्णपणे गेला असल्याचं मोदी म्हणालेत. मंदिर निर्माण झालं, शांततेत त्याचं देशात स्वागत करण्यात आलं. त्या३नंतर कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचंही ते म्हणालेत.
मोदी इज इंडिया
काँग्रेसच्या काळात इंदिरा इज इंडिया असं म्हटलं जात असे, त्यावर आता मोदी इज इंडिया असं झालंय का, या प्रश्नावर आपण भारतमातेचे पुत्र असल्याचं मोदींनी उत्तर दिलंय. आईची सेवा करतोय, यातच सर्व काही असं मोदी म्हणालेत.
सनातनवरुन काँग्रेस, द्रमुकवर टीका
सनातन धर्माचा विरोध करणाऱ्या द्रमुकसोबत काँग्रेस का आहे, याचा विचार करायला हवा, त्यांना प्रश्न विचारण्याची गरज असल्याचं मोदी म्हणालेत. द्रमुकनं घेतलेल्या या भूमिकेमुळं जनतेत संताप आहे, आणि त्याचा फायदा भाजपाला तामिळनाडूत होईल, असा दावाही त्यांनी केलाय. तामिळनाडूचे भाजपा प्रदेशाध्यक्ष अण्णा मलाई यांच्या कामाचंही त्यांनी कौतुक केलंय. कोणत्याही राज्यावर आणि मातृभाषेवर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका मोदी यांनी मांडलीय.
ईडी, सीबीआयचा गैरवापर होतोय का
ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग यांच्यासाठीचे कायदे मोदी सरकारनं तयार केलेले नाहीत, असं पंतप्रधान म्हणालेत. नाचता येईना अंगण वाकडे, अशी विरोधकांची अवस्था असल्याची टीका मोदी यांनी केली आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावर टीका करुन आत्तापासून विरोधक अपयशाचं कारण शोधत असल्याची टीका त्यांनी केलीय.
ईडीच केवळ ३ टक्के राजकीय व्यक्तींवर कारवाई झाल्याचं सांगत ९७ टक्के ड्रग्ज माफिया, भ्रष्टाचारी अधिकारी असल्याचा दावा त्यांनी केलाय. २०१४ नंतर १ लाख कोटींची संपत्ती ईडीनं जप्त केल्याचं त्यांनी सांगितलंय. गेल्या १० वर्षांत २२०० कोटी रुपये जप्त केल्याचं त्यांनी सांगितलंय.