Twitter : @SantoshMasole
धुळे
मुंबईतील कॉँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्यावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा यासाठी या सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नेत्यांमार्फत जंग-जंग पछाडले जात होते. मात्र, त्यास प्रत्येक वेळी ठाम नकार दिल्यानेच कुणाल पाटील हे अध्यक्ष असलेल्या जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीवर तपासणी पथकाने आज पहाटे छापा घातला. सूतगिरणी व्यवस्थापनासह काही भ्रमणध्वनी व लँडलाईन फोनसह सगळीच संपर्क यंत्रणा खंडित करून पथकाने हा परिसर पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेतला.
अचानक पोलीस कुमकासह धडकलेल्या या ताफ्याने अधिकारी, कर्मचारी कामगारांमध्ये खळबळ उडाली. पण हे पथक नेमक्या कोणत्या विभागाचे आहे, याबद्दल गुप्तता पाळण्यात आली. आ. कुणाल पाटील यांच्याकडे गेल्या नऊ वर्षांपासून जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचे अध्यक्षपद आहे. मोराने (ता.धुळे) शिवारात असलेल्या या सूतगिरणीत ही तपासणी सुरू झाली. याचवेळी पथकांतील काही अधिकाऱ्यांनी सूतगिरणीच्या व्यवस्थापकांच्या निवासस्थानीही तपासणी केल्याचे सांगितले जाते.
आ. कुणाल पाटील हे काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आ .कुणाल पाटील यांच्याकडे नुकतीच विदर्भातील अमरावती व नागपूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे. धुळे जिल्ह्यातील एकूण पाच विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडून येणारे कुणाल पाटील हे एकमेव आमदार आहेत. भाजपाच्या नेतृत्वाकडून कुणाल पाटील यांना गळाला लावण्याचा प्रयत्न झाल्याचेही पार्श्वभूमी असून या साऱ्या घडामोडींच्या अनुषंगाने आज या सुतगिरणीवर घालण्यात आलेला छापा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.
“तपासणी होत आहे हे खरे असले,तरी सुतगिरणीवर कोणत्या एजन्सीने छापा घातला आहे याची अद्याप माहिती नाही. संपर्क यंत्रणा बंद करण्यात आली असून या संदर्भात आपणास या क्षणापर्यंत काहीही कल्पना नाही. सूतगिरणीचे लेखापरीक्षण झाले आहे. त्यात कुठलाही दोष आढळून आलेला नाही. ही छापमारी असेल, तरी त्यामागे राजकीय हेतू असेल असे आपण ठोस काही कळल्याशिवाय म्हणू शकत नाही.
आ.कुणाल पाटील
प्रदेश कार्याध्यक्ष, काँग्रेस