Twitter : @NalavadeAnant
मुंबई
राज्यातील विविध समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित असताना जातनिहाय जनगणना (Caste-wise census) हाच एक उपाय आहे. त्यामुळे बिहारच्या (Bihar) धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी आणि याचा कालबध्द कार्यक्रम महायुती सरकारने जाहीर करावा, अशी आग्रही मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी सोमवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केली.
जातनिहाय जनगणना करून सर्व माहिती लोकांसमोर मांडल्याबद्दल बिहार सरकारचे अभिनंदन करत वडेट्टीवार म्हणाले की, राहुल गांधी सातत्याने जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी करत आहे. मात्र हे सरकार त्यापासून पळ काढत आहे. या सरकारला पळ काढण्याचे कारण काय असा सवाल उपस्थित करत हिंदुत्व राजकारण (Politics of Hindutva) करताना देशात ओबीसी हिंदू नाहीत का? त्यांना आरक्षण मिळायला नको का? त्यातूनही हे सरकर पळ काढत असतील तर ते दुर्दैव असल्याचंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, “काँग्रेसच्या काळात २०११ साली जातनिहाय जनगणना झाली होती. या जनगणनेमध्ये प्रत्येक जातीचा डेटा गोळा केलेला आहे. ती माहिती उघड करावी ही मागणी राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी केली होती. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षण (Reservation in Local body authorities) कायम राहावे म्हणून ही भूमिका मांडली. मात्र त्यातही सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
एकाबाजूला ओबीसी जनजागरण यात्रा काढायची आणि दुसरीकडे या मूलभूत प्रश्नाना बगल द्यायची अशी दुट्टप्पी भूमिका सरकार घेत असून ओबीसींना हक्कापासून वंचित ठेवायचे महापाप हे सरकार करत आहे. जातनिहाय जनगणना करताना संघ (RSS) आडवा येतो का? असा खोचक सवाल करत मनुवादी विचाराने तुम्ही सरकार चालवणार का? अशी विचारणाही वडेट्टीवार यांनी केली.
राज्यात विविध समाजाचे आरक्षण प्रश्न प्रलंबित आहेत, त्यावर जातनिहाय जनगणना हा एक उपाय आहे. बहुजनांचा हिताचा विचार करून न्याय देणार का? असं म्हणत बिहारच्या धर्तीवर राज्यात जातनिहाय जनगणना करावी आणि याचा कालबध्द कार्यक्रम महायुती सरकारने जाहीर करावा, अशी आग्रही मागणीही वडेट्टीवार यांनी केली.