महाड : सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला रायगड किल्ला हा केवळ ऐतिहासिक वास्तू नसून हिंदवी स्वराज्याच्या अभिमानाचा जिवंत साक्षीदार आहे. अशा पवित्र स्थळी अलीकडेच झालेल्या प्री-वेडिंग शूटच्या घटनेने शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असून, “गड-किल्ले जपा, इतिहास जपा — हाच खरा शिवभक्तीचा मार्ग”, असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी केले.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले की, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि जिथे त्यांची समाधी आहे, त्या पवित्र स्थळी मनोरंजनासाठी आणि दिखाव्यासाठी प्री-वेडिंग शूट करणे हे अत्यंत असंवेदनशील कृत्य आहे. गड-किल्ले हे केवळ पर्यटन स्थळ नसून ते आपल्या पूर्वजांच्या बलिदानाची, स्वाभिमानाची आणि संघर्षाची साक्ष देणारी स्थळे आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी वावरताना प्रत्येकाने शिस्त, आदर आणि ऐतिहासिक भान ठेवणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंत यांनी प्रशासनालाही सवाल केला आहे. Archaeological Survey of India (ASI) च्या नियमांनुसार परवानगीशिवाय अशा प्रकारचे छायाचित्रण करणे गुन्हा आहे. मग ही घटना घडली कशी? त्या वेळी प्रशासन आणि पोलीस काय करत होते? या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.
तरुणाईला आवाहन
आजच्या तरुणाईने आधुनिकतेसोबत इतिहासाचे भान राखणे आवश्यक आहे. आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगताना तिचा अवमान होणार नाही याची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे सावंत यांनी सांगितले. “जर आज आपण शांत बसलो, तर उद्या अशा घटना वाढतील आणि आपल्या इतिहासाचा अपमान होईल. त्यामुळे जागृती, सजगता आणि गरज पडल्यास कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

