रत्नागिरी
एसीबीच्या चौकशीनंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उत्पन्नापेक्षा ११८ टक्के संपत्ती जास्त असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. आरोपपत्रात त्यांची पत्नी, मुलगा यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे साळवींना अटक होण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानी एसीबीकडून धाड टाकण्यात आली. आतापर्यंत सहा वेळा राजन साळवी यांना एसीबीने चौकशीसाठी अलिबाग कार्यालयात बोलावलं आहे.
एसीबीच्या धाडीनंतर राजन साळवी म्हणाले, ज्या दिवशी एसीबीकडून पहिली नोटीस मिळाली आणि मला चौकशीला उपस्थित राहायला सांगितलं, त्यादिवशी मला माहिती होतं की, मी मंडळी माझ्या घरापर्यंत पोहोचणार. त्यामुळे मी सर्व अधिकाऱ्यांचं स्वागत केलं. याशिवाय जे काही सहकार्य हवं असेल ते करण्याची माझी भूमिका आहे.
पुढे बोलताना साळवी म्हणाले, मला अटक झाली तरी चालेल.. अटक, जेल मला काही नवीन नाहीत. मी कसा आहे हे मला माहिती आहे आणि माझ्या कुटुंबाला, जनतेला माहिती आहे. भविष्यातही मला कितीही त्रास झाला, अटक झाली, तरीही मी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असं राजन साळवी यांनी ठामपणे सांगितलं.
काही दिवसांपूर्वी लाचलुचपत विभागानंही त्यांच्यां कुटुंबीयांना नोटीस पाठवून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. याशिवाय काही दिवसांपूर्वीच एसीबीकडून त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळीही अलिबागच्या एसीबी कार्यालयाच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील त्यांच्या हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आलं होतं. आता पुन्हा एसीबीकडून त्यांच्या घरावर धाड टाकण्यात आली आहे.