मुंबई : भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झालं आहे. ते वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार होते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ते आजारी होते. त्यातच आज त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.
राजेंद्र पाटणी यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. त्यांच्या दोन्ही किडण्या काम करीत नव्हत्या. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते आजारी होते. आधी शिवसेना त्यानंतर भाजपमध्ये येत त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू ठेवली.
देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला शोक…
अत्यंत दुःखद बातमी. विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.