मुंबई : काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam)यांनी पक्षाविरोधात उघडपणे भूमिका घेतल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे . त्यानंतर आज त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला रामराम केला आहे . यासंबधीची पोस्ट देखील सोशल मिडीयीवर शेअर केली आहे. त्यामुळे आता पुढे त्यांची भूमिका काय असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे संजय निरुपम उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक होते .मात्र ऐनवेळी ही जागा महाविकास आघाडीचा भाग असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देण्यात आली. आता या जेगावर अमोल कीर्तीकर यांना तिकीट देण्यात आले आहे. याच कारणामुळे ते नाराज होते. त्यानंतर त्यांनी पक्षविरोधात भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge)यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. या निर्णयानंतर संजय निरुपम यांनी राजीनामा देण्याचा मोठा निर्णय घेतला. दरम्यान निरुपम यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना खरगे यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात असलेला मी निर्णय घेत आहे. मी आज माझ्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. माझा राजीनामा स्वीकारावा. खूप खूप धन्यवाद, असं निरुपम आपल्या पत्रात खरगे यांना उद्देशून म्हणाले आहेत.
दरम्यान, वेळोवेळी काँग्रेसच्या धोरणांवर बोट ठेवणारे निरुपम आता नेमका काय निर्णय घेणार. ते उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात अमोल कीर्तीकर यांच्याविरोधात प्रचार करणार का? त्यांच्या राजीनाम्यामुळे मुंबईत काँग्रेसला काय फटका बसणार? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. तर दुसरीकडे संजय निरुपम लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करु शकतात, अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत