मुंबई- महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढाही अद्याप सुटलेला दिसत नाहीये. काँग्रेस भिवंडी आणि सांगली या दोन्ही जागांवरुन अद्यापही नाराज आहे. काल रात्री पार पडलेल्या मविआच्या बैठकीत जागावाटपावरुन पुन्हा एकदा जोरदार चर्चा झाल्याची माहिती आहे. या वादामुळं जागा वाटपाची चर्चा अपुरीच राहिल्याचं सांगण्यात येतंय. मुंबईत काँग्रेससाठी कवळ दोनच जागा सोडण्यात आल्यानं काँग्रेस नाराज आहे. त्यामुळं ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या जागेवर काँग्रेसच्या दयानंद चोरगेंना उमेदवारी देण्यासाठी काँग्रेसनं आग्रही भूमिका घेतल्याचं सांगण्यात येतंय. तर भिवंडीवर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसनंही दावा केलेला आहे.
उत्तर मध्य आणि उत्तर मुंबई काँग्रेसकडे
मुंबईतील उत्तर मध्य आणि उत्तर मुंबई हे दोन मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात येत असल्याचं काल उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय. जागावाटपाच्या चर्चेच सामील असलेल्या नेत्यांऐवजी उद्धव ठाकरे हे परस्पर उमेदवारांच्या घोषणा करताना दिसतायेत. यावरुन मविआत नाराजीचा सूर असल्याचं सांगण्यात येतंय. चर्चा सुरु असतानाच सांगली, उत्तर पश्चिम या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा ठाकरेंनी केली होती. त्यावरुनही वाद रंगलेला होता.
ठाकरेंच्या शिवसेनेची काय भूमिका
तर बैठकीत खडाजंगी झाली नाही असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या प्रत्येक बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा होते असं सांगणं चुकीचं आहे, जागा वाटपाची चर्चा संपलेली आहे, माध्यमांपर्यंत येणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत, असं ते म्हणालेत. भिवंडी बाबतचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात होणार असल्याचं सांगत, भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस लढेल, असंही राऊत यांनी सांगितलंय.
सांगलीमध्ये उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केलेला आहे तिथे उमेदवारी मागे घेतली जाईल अशी शक्यता बिलकुल नाही, उमेदवार मागे घेतला जाणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.