महाराष्ट्र ताज्या बातम्या

“मातोश्री”च्या गळ्यातील ताईत रवींद्र वायकर राजकीय बळी की पटलावरील मोहरा

X: @therajkaran

गेली कित्येक वर्षे मातोश्रीच्या गळ्यातील ताईत असणारे आमदार रवींद्र वायकर (MLA Ravindra Waikar) यांच्या कित्येक महिने अपेक्षित असलेल्या शिवसेना शिंदे गटातील (Shiv Sena Shind group) प्रवेशाने फारसे कोणाला आश्चर्य वाटत नसले तरी त्यांचा प्रवेश हा “राजकारणाचा धंदा, धंद्यातील राजकारण आणि त्यामागचे अर्थकारण” सुरक्षित राहावे यासाठीच केलेला खटाटोप आहे, अशी चर्चा राज्यातील जाणकारांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे वायकर हे जीवघेण्या राजकीय पटलावरील मोहरे आहेत, की “माझे कुटुंब माझा परिवार” यासाठी दिलेले राजकीय बळी आहेत हे येणारा काळच सिद्ध करेल.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते (Shiv Sena Uddhav Thackeray group) आणि ठाकरे कुटुंबातील सदस्य म्हणूनच गणले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांचा बहुचर्चित आणि अपेक्षित राजकीय स्विचओव्हर काल थेट मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर पार पडला. शिवसेना शिंदे गटात वायकर यांनी कुटुंबियांसह काल प्रवेश घेतला आणि स्वतःच्या कुटुंबासह उद्धव आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) कुटुंबियांना पण अनेक प्रकरणांतून वाचवले, अशी प्रतिक्रिया लगेचच राजकीय वर्तुळात उमटली.

भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiyya) आणि शिवसेनेचे माजी खासदार आणि दोपहर का सामनाचे संपादकपद भूषविलेले, पण सध्या काँग्रेसमध्ये असलेले संजय निरुपम (sanjay Nirupam) यांनी याच रवींद्र वायकर यांच्यावर विविध आरोपांची राळ उडवली होती. मातोश्रीच्या “किचन कॅबिनेट”चे सदस्य असलेले रवींद्र वायकर हे सातत्याने तीन वर्षे मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष (Chairman of BMC Standing Committee) होते. सोन्याचे अंड देणारी कोंबडी म्हणून या पदाकडे बघितले जाते. सरासरी पन्नास ते पंचावन्न हजार करोड रुपयांचे वार्षिक बजेट या महापालिकेचे आहे. यंदाच्या वर्षी ते साठ हजार करोड रुपयांपर्यंत पोहचले आहे. या समितीचे अध्यक्षपद पटकवायचे म्हणजे व्यक्ती सर्वार्थानेच किती सक्षम असायला हवी हे सुज्ञांस सांगायला नको. असे हे हाय प्रोफाइल पद वायकर यांनी तब्बल तीन वर्षे भूषविले. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेची पावती वायकर यांनी मातोश्रीला सातत्याने दिली असणार याबद्दल जाणकारांना शंका नसेल.

संजय निरुपम आणि किरीट सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार २००२/२००३ पासूनच वायकरांनी कोकण पट्ट्यात जमिनी विकत घ्यायला सुरुवात केली होती. कोकणातील विविध भागात सुमारे ४५० एकर जमीन, ज्याची किंमत तब्बल ९०० करोड रुपयांपर्यंत जाते, एवढा अवाढव्य व्यवहार वायकरांनी केला आहे, असा आरोप निरुपम यांनी केला होता.

तर अलिबाग जवळील कोर्लई येथे वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर व रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी १२५ करोड रुपयांची साडे अठरा लाख फूट जमीन विकत घेतली, असेही निरुपम यांनी म्हटले होते. मात्र २०१६ साली तत्कालीन भाजप – शिवसेना युतीच्या (BJP – Shiv Sena alliance) मुख्यमंत्र्यांनी एका अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रीती भोजन समयी या कोर्लई प्रकरणी क्लीन चिट देण्याचे आश्वासन ठाकरे यांनी मिळवले आणि हे प्रकरण थंडावले, असा ही आरोप निरुपम यांनी केला होता. खरंतर ही जमीन नाईक कुटुंबीयांकडून मनीषा वायकर व रश्मी ठाकरे यांनी रीतसर विकत घेतली होती. २०२१ पर्यंत त्याची घरपट्टी देखील भरण्यात आली. मात्र, आपण साडे चार करोड रुपये देऊन फक्त साडे नऊ एकर जमीनच घेतली असल्याची कबुली देत, बाकी सगळे आरोप वायकर यांनी फेटाळून लावले होते.

या प्रकरणात वायकर यांच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर थेट उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे नाव कागदोपत्री असल्याने विरोधकांना आयते कुरण मिळाले. त्यातच जोगेश्वरी येथील रवींद्र वायकर यांनी उभारलेली, विरोधकांसह शिवसेनेतील काही नेत्यांच्या देखील डोळ्यात खुपणारी आणि सुप्रीमो असा मोठ्ठा फलक झळकावत असलेल्या मातोश्री या पंचतारांकित वास्तू बाबत देखील आक्षेप घेतले गेले. सदरची जागा ही सार्वजनिक वापरासाठी बगीचा म्हणून आरक्षित होती असे या आरोपामध्ये म्हंटले गेले होते.

भाजप नेते सोमय्या या प्रकरणांच्या मागे हात धुवून लागले होते. रवींद्र वायकर यांना त्यांनी सळो की पळो करून सोडले होते. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा (EOW) आणि आर्थिक कायद्याची अंमलबजावणी करणारी ई डी (ED) या दोन्ही संस्था वायकर यांच्यापर्यंत पोहचल्या होत्या. जेवढे वायकर कुटुंब यात गुंतत जाणार तेवढाच त्रास ठाकरे कुटुंबाला पण होणार हे सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट असल्यानेच वायकर यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशाच्या माध्यमातून या दोन्ही प्रकरणांची धार बोथट करण्यासाठीच ही राजकीय खेळी उदयास आली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे वायकर यांचा प्रवेश ही राजकीय बुद्धिबळातील एका मोहऱ्याची केलेली चाल आहे की अस्तित्वाच्या राजकारणात दिलेला राजकीय बळी आहे हे लवकरच कळेल.

मध्यंतरी चर्चेत आलेली रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी घेतलेली भाजपच्या पॉवरफुल केंद्रीय नेत्यांची गुप्त भेट ही केवळ दिशा सालीयन (Disha Salian), सुशांतसिंग (Sushant Singh Rajput) प्रकरणासाठीच नसून त्यामागे कोर्लई आणि जोगेश्वरी येथील प्रकरणे धसास लावण्याचा पण अजेंडा होता असेही आता म्हंटले जात आहे.

मुंबई महापालिकेने (BMC) काही दिवसांपूर्वीच जोगेश्वरी प्रकरणात एक पाऊल मागे घेत याची चुणूक दाखवली आहेच. कोर्लई प्रकरणात देखील अशाच काही घडामोडी घडतात का हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल. तो पर्यंत किरीट सोमय्या आणि संजय निरुपम यांना शुभेच्छा देणे इतकेच आपल्या हातात आहे.

Also Read: राजकारण हा माझा प्रांत नाही: नाना पाटेकर

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात