लातूर
लातूरच्या निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना संकुलात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रतिकृतीचे अनावरण आज करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी अभिनेता रितेश देशमुख भाषणादरम्यान वडिलांच्या आठवणीत भावुक झाला.
समाज आणि कुटुंबात वेगवेगळ्या भूमिका बजावताना तुम्ही लोकांशी कसे वागता हेच खरं भांडवल आहे. माझे आजोबा आणि वडील विलासराव यांचे नाते अतिशय आदराचे होते. आजोबांनी आपला मुलगा मुख्यमंत्री झाल्याचं कौतुक केलं, पण त्यांना काही त्रास झाला तर आजोबा नेहमी त्यांच्या पाठिशी होते. राजकारणात टीका करताना वैयक्तिक टीका करू नका, असंही आजोबांनी बाबांना सांगितलं होतं.
ही घटना आपल्याला बाबांनी म्हणजेच विलासरावांनी सांगितल्याची आठवण रितेश देशमुखने सांगितली. समाजात वावरताना ही खबरदारी घेतली पाहिजे. याला संस्कृती म्हणतात. हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न आपण सर्व बांधवांनी केला पाहिजे. मात्र आजकाल राजकारण ज्या स्तरावर भाषणं होतात ते पाहून वाईट वाटतं. एकेकाळी थोर नेत्यांची सत्ता असलेला महाराष्ट्रात आज असं काही पाहावं लागतं.
विलासराव आणि दिलीपराव एकमेकांना भावासारखं मानत. या दोन भावांना एकमेकांकडून काय मिळणार? असा विचार त्यांनी कधीच केला नव्हता. आपण आपल्या भावाला कसा आधार देऊ शकतो, हाच विचार त्यांनी केला. 12 वर्षांपूर्वी विलासरावांचं निधन झालं, पण आम्हाला आमच्या वडिलांची उणीव भासू नये म्हणून काका नेहमी आमच्या पाठीशी उभे राहिले. माझं काकांवर प्रचंड प्रेम आहे. काका-पुतण्याचं नातं कसं असायला हवं याचं ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर आले, असं म्हणत रितेश देशमुख भावुक झाले.